हिंजवडीच्या इतिहासातील पहिलीच घटना; ३ भावंडांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, वडिलांनी फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:25 IST2025-12-03T15:22:12+5:302025-12-03T15:25:26+5:30
हिंजवडी अपघातात रोज, हसत खेळत शाळेत येणाऱ्या आणि वर्ग मित्र-मैत्रिणीसोबत धमाल मस्ती करणाऱ्या प्रसाद भावंडांचा असा दुर्दैवी अंत झाला

हिंजवडीच्या इतिहासातील पहिलीच घटना; ३ भावंडांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, वडिलांनी फोडला टाहो
हिंजवडी : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ सोमवारी (दि.१) झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन सख्ख्या भावंडांवर हिंजवडी गावठाणमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माध्यमिक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी हिंजवडी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अपघातग्रस्त मुलांची नावे समोर येताच हिंजवडी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती. आई - वडिलांनी अंत्यसंस्कारावेळी अक्षरशः टाहो फोडला. शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद यांनी साश्रू नयनांनी यावेळी निरोप दिला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुरज प्रसाद इयत्ता पहिली, अर्चना प्रसाद इयत्ता चौथी तसेच प्रिया प्रसाद इयत्ता दहावी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होते. हिंजवडीमधील पंचरत्न चौकात वास्तव्य करत असणाऱ्या प्रसाद कुटुंबीयांना घरापासून हाकेच्या अंतरावर शाळा आहे. रोज, हसत खेळत शाळेत येणाऱ्या आणि वर्ग मित्र-मैत्रिणीसोबत शालेय शिक्षणाबरोबर धमाल मस्ती करणाऱ्या प्रसाद भावंडांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मंगळवारी दिवसभर शाळेत हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांना साश्रुनयनांनी निरोप देण्यासाठी शालेय मित्र-मैत्रिणी आणि शिक्षक उपस्थित होते. सरपंच गणेश जांभुळकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनीसुद्धा प्रसाद कुटुंबाला आधार देत सहकार्य केले.
भेदरलेल्या अवस्थेत शालेय मित्रांना निरोप
दिवसभर अपघात कसा झाला, काय झाले असेल, मृतदेह कोठे आहे, कधी येणार यासह प्रसाद भावंडांच्या आठवणीबाबत शाळेत दबक्या आवाजात विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होती. साडेपाच वाजता शाळा सुटल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी प्रसाद कुटुंब राहत असलेल्या घरी गर्दी केली होती. अनेकांनी शिक्षकांबरोबर स्मशानभूमीत हजेरी लावली. तीन चिमुकल्या मुलांच्या पेटलेल्या चिता उपस्थित विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत पाहत होते. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख सुरेश साबळे, मुख्याध्यापक बापू येळे, माध्यमिकचे मुख्याध्यापक रवींद्र फापाळे यासह बहुतांश शिक्षकवृंद उपस्थित होते.
आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
प्रसाद कुटुंबातील प्रिया प्रसाद ही माध्यमिकमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. अभ्यासाबरोबर वक्तृत्व गुणसंपन्न असलेली प्रिया शिक्षकांबरोबर सहकारी वर्ग मित्रांची लाडकी होती. अनेकदा तिने भाषणात आणि शिक्षकांबरोबर संवाद साधताना आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र, अचानक काळाने झडप घातल्याने तिचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याची भावना शिक्षक व्यक्त करत होते.
हिंजवडीच्या इतिहासातील पहिलीच घटना
हिंजवडीमध्ये तीन सख्ख्या भावंडांवर एकाच वेळी, एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे. प्रसाद कुटुंब मूळचे परराज्यातील असले तरी, त्यांच्या लाँड्री व्यवसायामुळे स्थानिक ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रसाद कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने स्थानिक नागरिकांनीसुद्धा त्यांना आधार देत सावरण्याचा प्रयत्न केला.