शेतकऱ्यांना त्वरीत मदतीची आवश्यकता; सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:24 IST2025-10-04T16:23:52+5:302025-10-04T16:24:30+5:30
जमिनी वाहून गेल्या आहेत, नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

शेतकऱ्यांना त्वरीत मदतीची आवश्यकता; सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत - शरद पवार
बारामती : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या संकटात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्वरित मदत आणि भरपाईची आवश्यकता आहे. सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत ,अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीवर पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. जमिनीवाहून गेल्या आहेत. नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच वाहून गेली त्याचे पुनर्वसन कसं करायचा हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. पवार यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या नुकसानीबाबत सरकार काय धोरण जाहीर करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे. पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेट घेत येथील परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे. तसेच जास्तीची मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील या संकटग्रस्तांना उभे करण्यासाठी सरकार हातभार लावेल,अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.