निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून करतोय दहशतवादाचा अवलंब; संजय राऊत यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 16:23 IST2026-04-29T16:22:39+5:302026-04-29T16:23:51+5:30
‘एन्काऊंटर स्पेशलिस्टवर निवडणुका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदींसारख्या लोकप्रिय नेत्याला का भासावी?, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत.

निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून करतोय दहशतवादाचा अवलंब; संजय राऊत यांचा आरोप
पुणे : ‘पश्चिम बंगालसारख्या राज्यात ममता बॅनर्जी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व असताना त्यांच्या पराभवासाठी अडीच लाख पॅरा मिलिट्री फोर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये नेऊन ठेवली आहे. साम, दाम, दंड, भेद याचा वापर होतोय. हा प्रशासकीय, निवडणूक आयोगाचा दहशतवाद असून, ही अत्यंत गंभीर गोष्ट देशाच्या लोकशाहीत घडतेय. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करतोय’, असा आरोप उद्धवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
‘पुण्यात, पिंपरी-चिंचवडला काय झालं, याच पद्धतीने निवडणुका लढण्यात आल्या. कोणत्या परिस्थितीत महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि होतायत हे मी तुम्हाला सांगायला नको. आम्ही लढणारे लोक आहोत’, असे संजय राऊत म्हणाले. ‘एन्काऊंटर स्पेशलिस्टवर निवडणुका जिंकण्याची गरज नरेंद्र मोदींसारख्या लोकप्रिय नेत्याला का भासावी?, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत. अंतराळात राजकारण सुरू झाले तर ते तिथले नेते होतील. जोडीला अमित शाह आहेतच. तरीही त्यांना पोलिस फोर्स नेऊन लोकांना धमक्या देऊन निवडणुका जिंकण्याची वेळ येत आहे. याचाच अर्थ त्यांना पराभव दिसतोय. पराभवाचे रूपांतर विजयात करण्यासाठी त्यांना असे उपद्व्याप करावे लागत आहेत’, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.
विधान भवनाच्या पायरीवर तुम्हाला आमचा उमेदवार कळेल
आमचा एकच उमेदवार आहे, सगळ्यांचा मिळून. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या ठीक आहे. आमचा एक उमदेवार आहे. उद्या विधान भवनाच्या पायरीवर तुम्हाला आमचा उमेदवार कळेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन मविआचे नेतृत्व करावे, अशी सर्वांची भूमिका आहे. खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या प्रमुख नेत्यांनी त्यांना विनंती केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
एकाच धर्माकडून हे होत नाहीय
मीरा रोडमध्ये धर्म विचारून मारले जातेय, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘हे देशभरात सुरू आहे. एकाच धर्माकडून हे होत नाहीय. सर्व धर्मांकडून गढूळ वातावरण या देशात निर्माण केलं जात आहे. या देशातील शांतता, सुरक्षा, धर्मस्वातंत्र्य हे सगळं संकटात आणायला भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी जबाबदार आहे.’
ज्यांनी मलिदा खाल्ला ते त्यांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये आहेत
गोरेगाव पत्रा चाळ प्रकरणात तुमच्यावर आरोप झाले, त्याच्या पुनर्विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. यावर राऊत म्हणाले की, ‘बोलवू द्या, नवीन काय आहे त्यात. माझ्यावर कसले आरोप झाले, कोर्टाला विचारा. ज्यांनी मलिदा खाल्ला ते त्यांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये आहेत. कोर्टाने सांगितलंय, संजय राऊत यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे. त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही.’