पक्षी तुमच्या अंगणात खेळावेसे वाटतात का ? तर मग 'ही' झाडे लावा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 02:39 PM2020-11-12T14:39:57+5:302020-11-12T14:41:00+5:30

र्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बागेत पाळलेलं मांजर, हलणारा झोपाळा, मोठे आवाज आणि माणसांचा सतत वावर असू नये नाही तर झाडांचं कितीही आकर्षण असलं तरी पक्षी फिरकणार नाहीत. ...

Do birds like to play in your yard? So plant 'these' trees ... | पक्षी तुमच्या अंगणात खेळावेसे वाटतात का ? तर मग 'ही' झाडे लावा... 

पक्षी तुमच्या अंगणात खेळावेसे वाटतात का ? तर मग 'ही' झाडे लावा... 

googlenewsNext

पुणे
''माझे मन तुझ्यासाठी फांदी होऊनिया झुले
 कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले...'' 

         आपल्या अंगणात रंगीबेरंगी आणि सुरेल गाणारे पक्षी यावेत यासाठी आपण किती आतुर असतो याचं कवि सुधीर मोघे यांनी किती छान वर्णन केलंय! पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी काही खास झाडं असतात का याची माहिती घेऊ या.

वन्य पक्ष्यांच्या खाण्याच्या सवयी नैसर्गिक असतात तर नागरी पक्ष्यांच्या सवयी नागरी जीवनशैलीशी जुळवलेल्या असतात.‌ दोन्ही अधिवासात निरीक्षण केल्यास लक्षात येतं की साधारण समजुतीच्या उलट फारच कमी जातींचे पक्षी फक्त फळं खातात. बहुतेक जाती बिया आणि कीटक खातात, काही जाती बिया, फळं, कीटक सगळंच खातात तर काही सरडे पाली आणि पक्ष्यांची पिल्लं खातात. शिकारी पक्षी तर पूर्ण मांसाहारी असतात. अश्या वन्य जातींसाठी आपण हस्तक्षेप न करण्याखेरीज फार काही करू शकत नाही. अधिवास बदलू नये, पक्ष्यांना आयतं खायला घालू नये आणि जंगलात खरकटं टाकू नये.

पक्षी, कीटक, प्राणी यांचं निसर्गात झाडांशी अगदी जवळचं नातं आहे. अन्न आणि निवारा देऊन फुलांचं परागीभवन करवून घेणं अशी ती देवाणघेवाण असते.
प्रत्येक झाडाचं परागीभवन करणारे एजंट ठरलेले असतात, ते प्राणी, पक्षी किंवा कीटक यापैकी कुणी तरी एकच असतात. पक्षी आणि झाडं यांच्यातलं नेमकं नातं समजून घेतलं म्हणजे पक्ष्यांसाठी झाडांची निवड करणं सोपं होईल.

फुलांमध्ये पराग आणि रस अशी दोन प्रलोभनं असतात. रंगीत पराग हे कीटकांना आकर्षित करतात आणि अशी फुलं पिवळ्या निळ्या रंगसंगतीची असतात. पक्ष्यांना फुलातला लाल रंग आणि गोड रस आकर्षित करतात. अश्या फुलांना सुगंध नसतो. ज्या झाडांचं परागीभवन पक्ष्यांकडून होतं त्यांची रचना पक्ष्यांनी रस खाताना तोंडाला पराग चिकटतील अशी वेगळी असते. 

वरील माहिती प्रमाणे वन्य अधिवासात झाडं लावताना लाल रंगाची फुलं येणारी झाडं रस खाणाऱ्या पक्ष्यांना आकर्षित करतील. उदाहरणार्थ पांगारा, सावर, पळस, धायटी, लाल इक्झोरा. झाडांवर बांडगुळं असतील तर ती न तोडता ठेवावीत, सनबर्ड आणि इतरांना त्यांची फुलं‌ खूप आवडतात. जंगलात उंबराच्या अनेक जाती आहेत त्यातली झुडूपं लावता येतील. रोपं मिळणार नाहीत पण जंगलातून बोटभर जाड काड्या आणल्या तर त्या रुजतील. वड पिंपळ सर्वत्र भरपूर असतात त्यामुळे ते टाळावेत. चिमण्यांना लपायला बोरीची झाडं आवडतात. किडलेल्या खोडांवर सुतारासारखे अनेक पक्षी येतात.

स्थानिक झाडांना फक्त उन्हाळ्यातच रस असणारी फुलं असतात. त्यामुळे बाग असल्यास राॅन्डेलेशिया, हॅमेलिया, रसेलिया किंवा इतर कुठलीही, लाल फुलांची, विदेशी, सतत फुलणारी झाडंही    चालतील. साधी लाल करदळ आणि लाल फुलांचे शोभेचे वेल पक्ष्यांना खूप आवडतात. फुलं येणारं कुठलंही झाड, देशी असो वा विदेशी, ते पक्ष्यांना वर्ज्य नसतं. गच्चीवर किंवा बाल्कनीत मोठे वृक्ष लावणं शक्य नाही पण सिंगापूर चेरी लावता येईल. ज्वारी, बाजरी, ‌मका किंवा सूर्यफूल कुंडीमध्ये कणसं येण्याइतपत वाढवणं शक्य आहे. या दाण्यांवर अनेक जातींचे पक्षी येतील. झाडांवर कीटकनाशकं वापरू नयेत आणि पाण्याचं उथळ पसरट भाडं ठेवावं. 

सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बागेत पाळलेलं मांजर, हलणारा झोपाळा, मोठे आवाज आणि माणसांचा सतत वावर असू नये नाही तर झाडांचं कितीही आकर्षण असलं तरी पक्षी फिरकणार नाहीत.

Web Title: Do birds like to play in your yard? So plant 'these' trees ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.