वाहनचालक कंत्राट प्रकरणी स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:26+5:302021-02-05T05:17:26+5:30

पुणे : कचरा वाहने चालविण्यासाठी ठेका पध्दतीने वाहनचालक पुरविणाऱ्या पूर्वीच्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी गदारोळ झाला़ ...

Dispute in the meeting of the Standing Committee on Driving Contract | वाहनचालक कंत्राट प्रकरणी स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ

वाहनचालक कंत्राट प्रकरणी स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ

पुणे : कचरा वाहने चालविण्यासाठी ठेका पध्दतीने वाहनचालक पुरविणाऱ्या पूर्वीच्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी गदारोळ झाला़ त्यामुळे स्थायी समितीची बैठक दीड तास थांबली गेली होती़ अखेर संख्याबळाच्या जोरावर सत्ताधारी पक्षाने पूर्वीच्याच ठेकेदाराला पुन्हा पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली़

महापालिकेतील घनकचरा विभागातील कचरा वाहने चालविण्यासाठी सुमारे साडेसातशे वाहनचालक हे ठेका पध्दतीने घेण्यात आले आहेत़ या ठेकेदाराची मुदत ३० डिसेंबर २०२० रोजी संपत होती़ त्यानुसार महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून नवीन ठेकेदार नियुक्तीचा व त्यांना देण्यात येणाऱ्या दराचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला होता़ पण पूर्वीच्या ठेकेदारालाच स्थायी समितीच्या बैठकीत यापूर्वीच २१ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती़

मंगळवारी (दि.२) पुन्हा मुदत संपल्याने नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर झाला असता, पुन्हा पूर्वीच्याच ठेकेदाराला पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याबाबत सत्ताधारी पक्षाने आग्रह धरला़ यावर शिवसेनेचे बाळा ओस्वाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र पठारे यांनी विरोध केला़ ठेकेदाराची मुदत संपली असतानासुध्दा नियमबाह्य पध्दतीने पुन्हा संबंधित ठेकेदाराला दोन वेळा मुदतवाढ का दिली जात आहे़ असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून, ठरावास विरोध केला़ यामुळे स्थायी समितीची बैठक दीड तास थांबली गेली़ अखेर बहुमताच्या जोरावर पूर्वीच्याच ठेकेदाराला पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली़

--------------------------

Web Title: Dispute in the meeting of the Standing Committee on Driving Contract