भीमाशंकर, देहू मंदिरांच्या विकास आराखड्याला मान्यता, भीमाशंकरसाठी १७३ तर देहूसाठी ४१ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:39 IST2026-05-19T14:38:25+5:302026-05-19T14:39:13+5:30

शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली आहे

Development plan for Bhimashankar, Dehu temples approved, provision of Rs 173 crore for Bhimashankar and Rs 41 crore for Dehu | भीमाशंकर, देहू मंदिरांच्या विकास आराखड्याला मान्यता, भीमाशंकरसाठी १७३ तर देहूसाठी ४१ कोटींची तरतूद

भीमाशंकर, देहू मंदिरांच्या विकास आराखड्याला मान्यता, भीमाशंकरसाठी १७३ तर देहूसाठी ४१ कोटींची तरतूद

पुणे : राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनाला सरकारचे प्राधान्य असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक, पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. त्यात जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर परिसरासाठी १७३ कोटी तर देहू येथील संत तुकाराम महाराज जन्मस्थानाच्या संवर्धनासाठी ४१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास आराखडा व संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धन विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

भीमाशंकर आदर्श गाव विकासासाठी १७२ कोटींची तरतूद

फडणवीस म्हणाले, ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कामे करावीत. या विकास आराखड्यांतर्गत अत्याधुनिक बसस्थानक आणि पार्किंग सुविधा करण्यात यावी. या कामांसाठी जागांचे भूसंपादन वेळेत करावे. या प्रकल्पासाठी सुमारे १७२.२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करावे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध वळण रस्ते आणि रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत. सध्या २.७ मीटर रुंदी असलेले रस्ते ७ मीटरपर्यंत रुंद करावेत. भक्त आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि एम्फीथिएटर, २५७ केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन पोलिस ठाणे आणि विश्रामगृह, भविष्यातील विकास आराखड्यांतर्गत डिंभे धरण परिसरात सबस्टेशन उभारणे, केबल कार (रोप वे) सुविधा सुरू करणे, एमटीडीसीच्या भीमाशंकर रिसॉर्टचा विकास करणे, राजापूर येथे नव्या पर्यटन सुविधांची निर्मिती करण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे.’

देहूसाठी ४१ कोटींची तरतूद

संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धन आणि विकासासाठी सर्वंकष आराखडा ४१.७१ कोटींचा आहे. या आराखड्यात संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, वैकुंठगमन स्थळ, भंडारा डोंगर आणि परिसरातील इतर धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करावे. यामध्ये रस्त्यांचे सुशोभीकरण, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी निवास सुविधा तसेच माहिती केंद्र उभारणे, भंडारा डोंगर परिसरात हरित क्षेत्र संवर्धन, वृक्षारोपण आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. आमदार सुनील शेळके यांनी संत तुकाराम महाराज जन्मस्थानाच्या संवर्धन आराखड्यात सुचवलेल्या कामांचा आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.

Web Title : भीमाशंकर, देहू मंदिर विकास योजना स्वीकृत; ₹214 करोड़ आवंटित

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने भीमाशंकर और देहू मंदिर विकास के लिए ₹214 करोड़ स्वीकृत किए। योजना में बेहतर सुविधाएं, बुनियादी ढांचे का उन्नयन और ऐतिहासिक स्थलों का संरक्षण शामिल है, जिसका उद्देश्य तीर्थयात्रियों के अनुभव और पर्यटन को बढ़ाना है।

Web Title : Bhimashankar, Dehu Temple Development Plan Approved; ₹214 Crore Allocated

Web Summary : Maharashtra government approves ₹214 crore for Bhimashankar and Dehu temple development. The plan includes improved facilities, infrastructure upgrades, and preservation of historical sites, aiming to enhance pilgrim experience and tourism.