पाठीला, मानेवर खोलवर जखमा; ७ वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची अमानुष मारहाण, राजगड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:01 IST2025-11-17T18:01:10+5:302025-11-17T18:01:25+5:30
संबंधित शिक्षकाने असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे सांगून माफी मागितली. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यात आले

पाठीला, मानेवर खोलवर जखमा; ७ वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची अमानुष मारहाण, राजगड तालुक्यातील घटना
राजगड: राजगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वेल्हे बुद्रुक येथे बेलदार समाजातील सात वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र, संबंधित शिक्षकाने माफी मागितल्याने सदरचे प्रकरण मिटविण्यात आले आहे. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी, तथाकथित समाजसेवक आणि स्थानिक कार्यकत्यांनी जिवाचा आटापिटा करून प्रकरण मिटवण्यात आले.
शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या सात वर्षांच्या विद्यार्थिनीचे नाव आरोही अजित चव्हाण असे आहे. शिक्षकाच्या अमानुष मारहाणीत तिच्या पाठीला, मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार बुधवारी (दि.१२) दुपारी घडला. मात्र, तिसऱ्या दिवशीही तिच्या पाठीवर मारहाणीचे व्रण, जखमा दिसत आहेत. याबाबत तिचे वडील अजित चव्हाण यांनी सांगितले की, आरोही हिने परीक्षेचा पेपर लिहिला नाही, त्या कारणाने चिडलेल्या शिक्षकाने आरोहीला अमानुष मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी झाली. असे असले तरी पालक अजित चव्हाण यांनी स्थानिक वेल्हे पोलिस ठाण्यात याप्रकरणी भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही.
वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते म्हणाले, अजित चव्हाण व इतर नागरिक, महिला पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी आरोही हिच्यावर उपचार करण्यासाठी लेखी पत्र तातडीने देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात चव्हाण यांनी तक्रार दाखल केली नाही. वेल्हे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक भरत शेंडकर म्हणाले, संबंधित शिक्षकाने असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे सांगून माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यात आले आहे, मात्र वास्तवात स्थानिक पातळीवर दबाव वाढल्याने अखेर प्रकरण मिटविण्यात आले आहे. अजित चव्हाण हे मुळचे सातारा येथील आहेत. गेल्या पाच वषर्षांपासून ते वेल्हे बुद्रुक येथे मिळेल तेथे राहुटी उभारून वास्तव्य करत आहे दगड फोडून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. मारहाण झाल्यापासून ते भयभीत झाले आहेत.