Pune: किचनचमधील चाकूने छातीवर वार; दारू पिऊन त्रास देत असल्याने मुलीने केला बापाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:03 IST2026-05-18T16:00:57+5:302026-05-18T16:03:31+5:30
डील दारु पिऊन घरी आल्यावर मुलीला शिवीगाळ करु लागले होते, त्यातून त्यांच्यात वादावादी झाली

Pune: किचनचमधील चाकूने छातीवर वार; दारू पिऊन त्रास देत असल्याने मुलीने केला बापाचा खून
पुणे : दारू पिऊन त्रास देत असल्याच्या रागातून ४० वर्षीय मुलीने त्याच्या ७० वर्षीय बापाच्या छातीत चाकूने वार करुन त्यांचा खून केला. जैनुद्दीन दस्तगीर फुलारी (वय ७०, रा. काशिवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दिलशाद जैनुद्दीन फुलारी (वय ४०, रा. पोलिस चौकीसमोर, काशिवाडी) हीला अटक केली आहे. हा प्रकार त्यांच्या राहत्या घरात रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनुद्दीन, त्यांची पत्नी आणि मुलगी दिलशाद फुलारी हे एकत्र राहतात. त्यांची मुले वेगळी राहतात. जैनुद्दीन फुलारी हे दारु पिऊन घरी आले. ते दिलशाद हिला शिवीगाळ करु लागले. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात घरातील किचनच्या ओट्यावर ठेवलेला कांदा कापण्याचा धारदार चाकू घेऊन दिलशाद हिने वडिलांच्या छातीवर वार केला. त्यात ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दिलशाद फुलारी हिला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक कुलदीप व्हटकर करत आहेत.