पुण्यात सर्वसामान्यांची गैरसोय होणार; उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 18:52 IST2022-10-31T18:52:32+5:302022-10-31T18:52:39+5:30
सर्वसामान्यांच्या होणाऱ्या गैरसोयीला टोरेंट कंपनीच पूर्णपणे जबाबदार

पुण्यात सर्वसामान्यांची गैरसोय होणार; उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद
पुणे : एमओपीएनजी परिपत्रकानुसार व्यापार मार्जिन सुधारित मिळेपर्यंत १ नोव्हेंबर (मंगळवार) पासून अनिश्चित काळासाठी पुणे ग्रामीण भागातील टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजीची विक्री न करण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.
पेट्रोल डीलर्स असोसिएशन, ओएमसी आणि टोरेंट गॅस यांच्या अनेकदा मेलद्वारे चर्चा झाली, मात्र टोरेंट कंपनीकडून ट्रेड मार्जिन पेमेंटबाबत कोणतीही वचनबद्धता आलेली नसल्याने तसेच त्यांच्यामुळेच झालेल्या विलंबामुळे व्याजासह सुधारित ट्रेड मार्जिनची देय रक्कम प्रलंबित असल्याने हा बंद पुकारण्यात आला आहे. याआधी देखील एक दिवसासाठी टोरेंट सीएनजी पंपावरील सीएनजी विक्री बंद ठेवण्यात आली होती, यानंतरही पुढे कोणताच ठोस निर्णय न झाल्याने आता बेमुदत सीएनजी विक्री बंद करण्यात आली आहे.
दरम्यान यामुळे सर्वसामान्यांच्या होणाऱ्या गैरसोयीला देखील टोरेंट कंपनीच पूर्णपणे जबाबदार असून, याकंपनीने केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशांची देखील पूर्ण अवहेलना केल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सांगितले.