भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:59 IST2025-12-16T11:57:40+5:302025-12-16T11:59:55+5:30
Jagannath Temple Birds: जगन्नाथ मंदिराचा हा एक मोठा चमत्कार मानला जातो की, मंदिराच्या मुख्य शिखरावरुन आजपर्यंत कोणताही पक्षी किंवा विमान उडत नाही.

भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
जगन्नाथ पुरी येथील ऐतिहासिक मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचा थवा उडताना दिसल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना सामान्य वाटत असली तरी, अनेक शतकांपासून मंदिराशी जोडलेल्या न सुटलेल्या रहस्याचा भंग झाल्यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
जगन्नाथ मंदिराचा हा एक मोठा चमत्कार मानला जातो की, मंदिराच्या मुख्य शिखरावरुन आजपर्यंत कोणताही पक्षी किंवा विमान उडत नाही. मंदिराच्या रचनेमुळे किंवा विशिष्ट नैसर्गिक प्रवाहामुळे हे घडते, हे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतू व्हायरल व्हिडीओमध्ये मंदिराच्या कळसावरून पक्षी उडताना दिसत आहे.
भविष्यवाणीचा धोका
या मंदिराशी संबंधित पौराणिक कथा आणि 'भविष्य मालिका' या प्राचीन ग्रंथानुसार, मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे दर्शन होणे हे मोठे अशुभ संकेत मानले जाते. कलीयुगाचा अंत जवळ आल्यावर आणि मोठा विनाश होण्यापूर्वी अशा घटना घडतील, असे या भविष्यवाणीत नमूद केलेले आहे.
भविष्य मालिका ग्रंथात उल्लेख केलेल्या अपशकुनांमध्ये, मंदिराच्या शिखरावरून दगड पडणे, 'नीलचक्र' वादळामुळे वाकडे होणे आणि अरुण स्तंभावर गिधाड बसणे यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, शिखरावर पक्षी दिसणे हे आगामी संकटाचे सूचक मानले जात आहे.
यापूर्वी याच वर्षी एप्रिल महिन्यात 'गरुडा'ने मंदिरावरील ध्वज घेऊन परिक्रमा केल्याची घटना देखील चर्चेत होती, तर एकदा शुभ मानले जाणारे पांढरे घुबड कळसावर बसलेले दिसले होते. मात्र, पक्ष्यांचे थवे उडताना दिसणे हे मंदिराच्या मान्यतेविरोधात थेट उल्लंघन करणारे असल्यामुळे, हा व्हिडिओ पाहणारे अनेक लोक सध्या चिंतेत आहेत.