Pune Election Result 2026 : "...पण नकारात्मक राजकारणाला पुणेकरांनी हद्दपार केलं; पुण्याच्या निकालाचा अर्थ काय?"; मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:46 IST2026-01-16T20:44:26+5:302026-01-16T20:46:34+5:30
Murlidhar Mohol On Pune Election Result 2026 : "आमच्याकडे जवळपास २००० पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते, आम्ही १६५ लोकांनाच संधी देऊ शकलो. पण ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली."

Pune Election Result 2026 : "...पण नकारात्मक राजकारणाला पुणेकरांनी हद्दपार केलं; पुण्याच्या निकालाचा अर्थ काय?"; मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले
हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा विजय आहे. मला असं वाटतं की आम्ही जे काही प्रचारामध्ये सकारात्मक प्रचार केला, विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार केला आम्ही. पुण्याच्या प्रगतीचा विचार करून मुद्दा मांडून तो प्रचार केला. त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा एकदा विकासाला, प्रगतीला मत दिलं आणि नकारात्मक राजकारण करणाऱ्यांना घरी पाठवलं. ह्याच निवडणुकीच्या निकालाचा हाच अर्थ होतो.
पुण्यात नकारात्मक राजकारण कुणी केलं? यावर बोलताना मोहळ म्हणाले, "तुम्ही पाहिलं या सगळ्या निवडणुकीच्या काळात अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं, नाव घेऊन टीका करणं. बघा राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे हँडल्स, पालकमंत्र्यांचे सोशल मीडिया हँडल, त्यांची टीम कुठल्या दर्जावर, कुठल्या खालच्या स्तरावरती गेली होती. काहीही करत होते. एआयच्या (AI) माध्यमातून व्हिडिओ तयार कर, काही डिझाईन्स करा. मला असं वाटतं लोकांना हे आवडत नाही. लोकांना असं वाटतं की शेवटी लोक हे विकासाला मत देतात. पुणेकर विकासाला आणि प्रगतीला मत देतात. पुण्याचं भविष्य आणि आमची पुढची पिढी कुठे सुरक्षित राहू शकते, याचा विचार पुणेकर जनता करते. म्हणून मला निश्चितपणे हा विश्वास होता, म्हणून पहिल्या दिवसापासून सांगत होतो की भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुन्हा एकदा सत्तेत येईल, पुणेकरांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल." मोहळ एबीपी माझासोबत बोलत होते.
मोहोळ पुढे म्हणाले, "मी पहिलेही कधी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही, आजही मला करायची नाही. मी जनमताचा जो कौल आहे, त्याचा खूप नम्रपणे आणि आदरपूर्वक स्वीकार करतो. ते करताना कर्तव्याची जाणीव आहे मला. शेवटी आम्ही आज सत्तेत आलो म्हणजे प्रत्येक पुणेकर व्यक्तीने जे मत दिलंय, ते देताना त्यांचा काहीतरी विचार आहे, भावना आहे, अपेक्षा आहे. हे मत मी पुण्याच्या विकासाला, भविष्याला देतोय, तर तो विकास झाला पाहिजे. प्रगतीकडे पुण्याने वेगाने वाटचाल केली पाहिजे. या देशातलं सर्वोत्तम शहर करण्याचा जो संकल्प आम्ही केलाय, त्याला ते मत होतं. म्हणून मी जबाबदारी म्हणून आजचा विजय स्वीकारतो. टीका करण्याचं काही कारण नाही आता, आम्ही आधीही केली नाही आणि आताही करणार नाही. पण नकारात्मक राजकारणाला पुणेकरांनी हद्दपार केलं."
lokmat.com/pune/pmc-pcmc-municipal-election-results-2026-live-updates-pune-and-pimpri-chinchwad-mahanagar-palika-nikal-in-marathi-ajit-pawar-murlidhar-mohol-bjp-ncp-ward-wise-winners-list-latest-news-a-a607/
मला त्यांचा अभिमान वाटतो, हा विजय मी त्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो -
"या विजयाचे श्रेय कुणाला द्याल? असे विचारले असता मोहळ म्हणाले, "आमचं जे नेतृत्व आहे, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आम्हा सर्वांना विश्वास आहे. मी पुणेकरांना या विजयाचे श्रेय देईन की, त्यांनी विकासाला मत दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला. तसेच आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे रात्रंदिवस काम करत होते. आमच्याकडे जवळपास २००० पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते, आम्ही १६५ लोकांनाच संधी देऊ शकलो. पण ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. काही लोक गेले, पण जे राहिले, त्यांनी, 'कमळ' हाच आमचा उमेदवार या विचाराने त्यांनी जे काही काम केले, मला त्यांचा अभिमान वाटतो आणि हा विजय मी त्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो," असेही मोहळ म्हणाले.