हिंजवडीत महिंद्रा इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब? स्फोट होणार? ई-मेल आल्याने शाळेत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:28 IST2025-12-03T13:28:06+5:302025-12-03T13:28:32+5:30
मेलची दखल घेत बॉम्ब शोधक नाशक पथक, पोलीस, श्वान घटनास्थळी दाखल झाले असून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

हिंजवडीत महिंद्रा इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब? स्फोट होणार? ई-मेल आल्याने शाळेत भीतीचे वातावरण
पिंपरी : हिंजवडीतील एका शाळेच्या मेलवर बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिंद्रा इंटरनॅशनल स्कुल असे या शाळेचे नाव आहे. या मेलने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मेलची दखल घेत बॉम्ब शोधक नाशक पथक, पोलीस, श्वान घटनास्थळी दाखल झाले असून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी महिंद्रा इंटरनॅशनल शाळेच्या ईमेल आयडीवर एक मेल आला होता. त्यामध्ये शाळेत बॉम्ब ठेवल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच स्फोट होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली. शाळेने तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून घटनेची हिंजवडी पोलीस, श्वानपथक, बॉम्ब शोधक पथक यांनी शाळेत धाव घेतली. संपूर्ण परिसर सुरक्षित करून शाळेत सर्वत्र तपासणी सुरू आहे. अचानक पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हा ईमेल कोठून पाठवला गेला? त्यामागील उद्देश काय? याबाबत सायबर विभाग तांत्रिक तपास करत आहे. प्राथमिक तपासाअंती हा ईमेल खोटा असण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पोलिसांकडून तपास सुरू आहे.