बारामतीत बालगृहातील १५ वर्षीय बेपत्ता मुलाचा निरा डावा कालव्यात मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:54 IST2025-02-22T10:54:15+5:302025-02-22T10:54:23+5:30
बालगृहामधून कोणाला काही न सांगता निघून गेला आणि पोहण्यासाठी कालव्यात उतरला

बारामतीत बालगृहातील १५ वर्षीय बेपत्ता मुलाचा निरा डावा कालव्यात मृतदेह सापडला
बारामती : बारामती शहरात बालगृहातील १५ वर्षीय मुलाचा निरा डावा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चर्चेस ऑफ ख्राइस बॉईज होममधील १५ वर्षीय राजवीर विरधवल शिंदे या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बारामती शहरानजीक बांदलवाडी येथे निरा डाव्या कालव्यात मुलाचा मृतदेह आढळून आला.
पाेलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीचे बालगृह अधीक्षक रॉबर्ट वसंत गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी माहिती दिली आहे. त्यानुसार, राजवीर शिंदे या बालगृहामध्ये सन २०१८ पासून दाखल आहे. राजवीर वीरधवल शिंदे हा त्याचे दोन मित्र अर्जुन वाघारी व मोईन अमीर शेख असे तिघे मंगळवारी मंगळवारी, १८ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजता बालगृहामधून कोणाला काही न सांगता निघून गेले. खरंतर ते नटराज पार्क येथे फिरायला गेले होते. फिरल्यानंतर ते कालव्यात पोहण्यासाठी उतरले. राजवीर याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडून वाहून गेला. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर गुरुवारी त्याचा मृतदेह बांदलवाडी येथे कालव्यात आढळून आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक चाैकशी करीत आहेत.