चालू गळीत हंगामात बारा लाख टन ऊस गाळपाचे भीमाशंकरचे उद्दिष्ट – दिलीप वळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:07 IST2025-10-03T15:06:24+5:302025-10-03T15:07:23+5:30
भविष्यात हा कारखाना देशातील आघाडीचा साखर कारखाना म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास वळसे पाटील यांनी व्यक्त केला

चालू गळीत हंगामात बारा लाख टन ऊस गाळपाचे भीमाशंकरचे उद्दिष्ट – दिलीप वळसे पाटील
अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून भविष्यात हा कारखाना देशातील आघाडीचा साखर कारखाना म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या २६ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हॉईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पूर्वा ताई वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड करावी जेणेकरून उत्पादनक्षमता वाढेल आणि एकरी शंभर टन ऊस घेणे शक्य होईल. ऊस तोड कामगारांची टंचाई लक्षात घेता भविष्यात हार्वेस्टरद्वारे तोडणी अपरिहार्य ठरणार असून, कारखाना इच्छुकांना पाच वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति टन पाच रुपये मदत तसेच कारखान्यातील अधिकारी-कामगारांचा एक दिवसाचा पगार पूरग्रस्त भागासाठी देण्याचे आवाहनही त्यांनी केले. कामगारांना दिवाळीनिमित्त 20% बोनस दिला जाईल अशी घोषणाही वळसे पाटील यांनी केली
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात इथेनॉल निर्मिती प्रकल्प कमी क्षमतेने चालत होता. पण कारखाना तोट्यात नव्हता. यावर्षी पूर्ण क्षमतेने कारखाना चालेल. परिणामी कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात इथोनाल प्रकल्पामुळे वाढ होईल. ही ऊस उत्पादकाच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. मागील हंगामात कारखान्याने ११ लाख ८० हजार टन गाळप पूर्ण करून एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीवर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठवाडा व सोलापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलीप वळसे पाटील यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अवघ्या अर्ध्या तासात ८४ लाख रुपयांचा निधी जमा झाला. यामधून १२ हजार किराणा किट्स तातडीने पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहेत. या उपक्रमात विविध संस्था, कारखान्याचे अधिकारी-कामगार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.