Baramati bypoll election 2026: बिचुकले, करुणा मुंडेंनी १०० चा आकडाही पार नाही केला; सुनेत्रा पवार तब्बल १ लाख मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:57 IST2026-05-04T11:56:58+5:302026-05-04T11:57:58+5:30
Baramati bypoll election 2026 प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीकडून विक्रमी मताधिक्याचा दावा करण्यात येत आहे

Baramati bypoll election 2026: बिचुकले, करुणा मुंडेंनी १०० चा आकडाही पार नाही केला; सुनेत्रा पवार तब्बल १ लाख मतांनी आघाडीवर
पुणे : बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबरोबर २३ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याचे लक्ष्य ठेवत मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे. या उमेदवारांमध्ये असणारे अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांना ८ व्या फेरीअखेर १०० मतांचा आकडा पार करता आला नाहीये.
प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसल्याने महायुतीकडून विक्रमी मताधिक्याचा दावा करण्यात येत आहे. दोन लाख २३ हजार ७०५ बारामतीकरांनी मतदान केले असून, त्यापैकी एक लाख ६५ हजार २६६ मते मिळाली, तरच मताधिक्याचा विक्रम होणार आहे. हा ‘जादुई आकडा’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गाठणार का, याबाबत उत्सुकता लागली आहे. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदान केले. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख ६५ हजार २६६ हा जादुई आकडा असणार आहे.
बारामती पोटनिवडणुकीत १३ व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार या १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर आहेत. १३ व्या फेरीअखेर एकूण झालेले मतदान ८ हजार ८३९ झाले असून सुनेत्रा पवार यांना ८५५९ मते मिळाली आहेत. तर इतर उमेदवारांना २८० मते मिळाली आहेत.