Shirur: कारची रिक्षा, दुचाकीला जोरदार धडक; महिला व पुरुष उडून थेट रस्त्यावर, चालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:02 IST2026-05-19T17:01:42+5:302026-05-19T17:02:13+5:30
या अपघातातील दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीचालक रस्त्याच्या कडेला पडले आणि अगदी त्यांच्या डोक्याजवळून कारचे चाक पुढे गेले

Shirur: कारची रिक्षा, दुचाकीला जोरदार धडक; महिला व पुरुष उडून थेट रस्त्यावर, चालकाचा जागीच मृत्यू
शिक्रापूर: पाबळ (ता. शिरूर) येथे पांजरपोळ जवळ शिरूर-पाबळ रस्त्यावर तीन वाहनांचा भीषण व विचित्र अपघात झाला आहे. कारने रिक्षा आणि दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचालक जागीच ठार झाला असून, एका महिलेसह चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भास्कर मकवाणे (वय ६०, रा. पाबळ, ता. शिरूर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shirur: कारची रिक्षा, दुचाकीला जोरदार धडक; महिला व पुरुष उडून थेट रस्त्यावर, चालकाचा जागीच मृत्यू
— Lokmat (@lokmat) May 19, 2026
(ही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात) #pune#shirur#accidentpic.twitter.com/OjcGVWUq11
शिरूर ते पाबळ रस्त्यावर कार पाबळ बाजूला येत होती. यावेळी कारचालकाने वेगात विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरात धडक दिली. यानंतर कारची त्याच बाजूने जाणाऱ्या दुचाकीलाही धडक बसली. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, रिक्षातील महिला व पुरुष उडून थेट रस्त्यावर पडले. यात रिक्षाचालक भास्कर मकवाणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर आशा घोलप (रा. घोलपवाडी, कान्हूर मेसाई), दुचाकीचालक सतीश खैरे (वय ४२, रा. खैरेनगर), कारचालक संभाजी जाधव (रा. भोरशेत पाबळ), कारमधील गणेश आगरकर व काळूराम चौधरी (दोघे रा. पाबळ) हे जखमी झाले. या अपघातातील दुचाकीचालक सतीश खैरे हे खैरेनगरचे माजी उपसरपंच आहेत. कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर खैरे रस्त्याच्या कडेला पडले आणि अगदी त्यांच्या डोक्याजवळून कारचे चाक पुढे गेले. हा सर्व अंगावर काटा आणणारा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, नशीब बलवत्तर म्हणून ते बचावल्याची चर्चा आहे.