एटीएममधील १७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; इंदापूर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 02:29 PM2023-07-14T14:29:42+5:302023-07-14T14:32:12+5:30

आरोपी रचपाल सिंह हा पुर्वी बँकेत नोकरी करत होता...

arrested two who robbed the ATM of 17 lakhs pune latest crime news | एटीएममधील १७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; इंदापूर पोलिसांची कारवाई

एटीएममधील १७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; इंदापूर पोलिसांची कारवाई

googlenewsNext

इंदापूर (पुणे) :इंदापूर एसटी बसस्थानकातील एटीएममधून १७ लाख ५५ हजार रुपये चोरुन नेणाऱ्या पंजाब येथील दोन सराईत चोरट्यांना बुधवारी (दि. १२) दौंड येथे अटक करण्यात इंदापूर पोलिसांनी यश मिळवले. रचपाल बलदेव सिंह (वय ३६ वर्षे, रा. बाबा दीपसिंगनगर, रोड नंबर १, भटिंडा, पंजाब) लखवीर बलदेव सिंह, (वय २९ वर्षे, रा. रायखाना, ता. तलवंडी जि. भटिंडा, पंजाब) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी या आधी सुपे (बारामती), तळेगाव (पुणे), गोवंडी (मुंबई), गंगापूर (राजस्थान), कोटा (राजस्थान) पठाणकोट (पंजाब) व उत्तराखंड राज्यात ही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

इंदापूर बस स्थानकाच्या व्यापारी गाळ्यात असणाऱ्या टाटा इंडिकॅश एटीएम मशीनमधून १७ लाख ५५ हजार रूपये चोरीस गेले होते. त्या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरी झाल्याची निश्चित वेळ व माहितीबद्दल पोलीस अनभिज्ञ होते. तेथे सुरक्षारक्षक नसल्याने बाकीची ही काही खबर लागत नव्हती. त्यामुळे तपासामध्ये बरेच अडथळे येत होते.

पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने इंदापूर शहर, दौंड, शिक्रापूर, रांजणगाव, उरळी कांचन परिसरातील अनेक सीसीटिव्ही कॅमे-यांची पाहणी करुन तांत्रिक माहितीवरुन उपरोक्त आरोपीवर तपास केंद्रित केला. बुधवारी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना इंदापूर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

आरोपी रचपाल सिंह हा पुर्वी बँकेत नोकरी करत होता. त्यामुळे त्याला एटीएम मशीन बाबतची सर्व  माहिती होती. दोघा आरोपींनी एटीएम मशीन खोलून त्यामध्ये पैसे भरण्याच्या कॅसेटजवळ स्पाय कॅमेरा बसवला. एटीएम मशीनचा पासवर्ड स्पाय कॅमेराच्या रेकॉर्डींगमधून बघून, त्यांनतर एटीएम मशीन उघडून त्यातील सर्व १७ लाख ५५ हजार रूपये लंपास केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

Web Title: arrested two who robbed the ATM of 17 lakhs pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.