नवले पुलावर पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकून मोटार उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:02 IST2025-11-24T16:00:26+5:302025-11-24T16:02:51+5:30
वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नवले पूल परिसरात वाहतूक विभागाने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे

नवले पुलावर पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकून मोटार उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप
पुणे : नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास व्हीआरएल बसस्थानक आणि सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून एक मोटार उलटली. सुदैवाने गाडीतील दोन्ही प्रवासी सुखरूप बाहेर पडले.
नवले पूल परिसरातील मागील काही दिवसांत झालेल्या अपघातामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर चढून उलटली. या अपघातामुळे वाहनचालक व दुसरा एक प्रवासी काही वेळ गाडीतच अडकले होते. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नवले पूल परिसरात वाहतूक विभागाने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबतच अवजड वाहन चालकांच्या वेग मर्यादेवरही नियंत्रण आणले आहे. मात्र, तरीही अनेक दुचाकीस्वारांसह मोटार चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
अपघात थांबणार कधी?
नवले पुलावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईही सुरु आहे. आता तर वाहतूक विभागाने अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केला आहे. तरीही अपघात थांबताना दिसत नाहीये. नागरिक आता भीतीच्या छायेतूनच या पुलावरून प्रवास करत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसात झालेल्या कंटेनरच्या अपघातानंतर काल पुन्हा एकदा अपघात झाला आहे. त्यामुळे आता हे नवले पुलावरचे अपघात थांबणार कधी? अशा सवाल उपस्थित होत आहे.