Ajit Pawar: शहाण्यांनी वाळू, लोखंडी पट्ट्या चोरल्या...! विकासकामे खराब करणाऱ्यांना अजितदादांनी फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:58 IST2025-10-17T18:57:52+5:302025-10-17T18:58:05+5:30
विकासकामे खराब करणाऱ्यांचे व्हिडिओ आणून देणाऱ्याला १ लाख बक्षीस देईल, आणि त्याला २ लाख दंड लावेल

Ajit Pawar: शहाण्यांनी वाळू, लोखंडी पट्ट्या चोरल्या...! विकासकामे खराब करणाऱ्यांना अजितदादांनी फटकारले
बारामती: बारामतीत वृद्ध माणसांना बसायला तिथे जागा केली. तसेच लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी त्यांना जखमा होऊ नयेत म्हणून समुद्रातील वाळू आणून टाकली. मात्र, काही शहाण्यांनी रात्री त्यातली वाळू पिशवीत भरून चोरली, ही जित्राबं माझ्या बारामतीत का आहेत? मला प्रश्न पडलाय यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. मी काही चांगलं केलंय त्या ठिकाणी ते गोधड्या वाढायला आणून टाकत आहेत.अरे तुझ्या घरात काय टाकायचे ते टाक ना मी जे चांगले केले त्याचा आणून का टाकतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकांमांना चोऱ्या करुन बाधा आणून कामे खराब करणाऱ्या अज्ञातांना फटकारले.
बारामती देशातील सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न आहे.त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात विविध विकासकामे हाती घेतली आहेत.मात्र, काही जणांनी यामध्ये चोऱ्या सुरु केल्या असल्याची खंत उपमुख्यमंत्री पवार यांनी एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने बोलताना व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, बारामती दररोज वेगवेगळ्या विकासकामांनी चर्चेत असते. या ठिकाणी सातत्याने विकास कामे सुरू आहेत. बारामतीत एवढा मोठा चांगला ब्रिज केला आहे. असं असताना देखील तिथं काहीजण चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे पायरी खराब होऊ नये म्हणून लावलेला लोखंडी अँगल तोडून नेत आहेत. अशा पट्ट्या चोरून नेतात आणि उद्या विकून टाकतात. उद्या एखाद्या वेळेस त्या ब्रिजवरून कोण चाललं आणि तो ब्रिज पडला, तर पुन्हा म्हणणार कशा पद्धतीने विकास केलाय, मात्र असं जर कोण करत असल्यास मोबाईल मध्ये त्याला न कळता त्याचं चित्रीकरण करा आणि मला आणून द्या. जो ते मला आणून देईल त्याला मी 'एक लाख' रुपयाचे बक्षीस देईल. जो सापडेल त्याला दोन लाख दंड करतो. म्हणजे त्यातील एक लाख रुपये याला देऊन टाकू आणि एक लाख रुपये नगरपालिकेला देऊन टाकू,असे पवार म्हणाले.