कृषी विभागाने आकडे तोंडावर फेकण्यापेक्षा बळीराजाला मदत करा - अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 09:45 IST2025-09-30T09:44:00+5:302025-09-30T09:45:26+5:30
केंद्र सरकारकडून मदत येणे गरजेचे आहे, मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटूनही अद्याप तरी मदतीची घोषणा केली गेलेली नाही.

कृषी विभागाने आकडे तोंडावर फेकण्यापेक्षा बळीराजाला मदत करा - अमोल कोल्हे
पुणे: कृषी विभागाने यापूर्वी शेतकऱ्यांना काय मदत केली, याचे आकडे तोंडावर फेकण्यापेक्षा बळीराजाला आधार देणे गरजेचे आहे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
शिरूर मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी सोमवारी निसर्ग मंगल कार्यालय येथे बैठक घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. मराठवाड्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला आता तातडीची व दीर्घकालीन मदतीची अपेक्षा आहे. पुरानंतर शेतातील मातीच वाहून गेली असल्याने रब्बीची पेरणी कशी करायची, असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. मागे काय मदत केली, त्याची आकडेवारी तोंडावर फेकण्यापेक्षा आता बळीराजाला ठामपणे मदतीची खरी गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार काय करतेय. हे महाराष्ट्राला कळू द्या. केंद्र सरकारकडून मदत येणे गरजेचे आहे, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, मात्र अद्याप तरी मदतीची घोषणा केली गेलेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बेडरूमसाठी २० लाख ५० हजारांची तरतूद होते, तर मग सर्वसाधारण शेतकऱ्यांना पहिली मदत तीन हजारांची केली. आपल्यापेक्षा लहान असलेला पंजाब राज्य पुराच्या वेळी आपल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करतो. मग आपल्याही शेतकऱ्यांना ठोस मदत मिळणे व शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे राज्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अठरापगड जातींनी एकत्र येऊन जगले पाहिजे.
सरकारने सामाजिक सलोखा स्थापन करणे गरजेचे आहे. मात्र, सरकारमधील लोक दोन समाजात दरी निर्माण करण्याचे काम करत आहेत. सामाजिक शांतता गरजेची आहे. कोणत्याही अशांत प्रदेशात विकासाचे काम होत नाहीत, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.