खड्डे चुकवताना अपघात; अवसरी बुद्रुक येथील २ चुलत भावांचा मृत्यू, मंचर - शिरूर रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 11:01 IST2025-10-14T11:01:04+5:302025-10-14T11:01:47+5:30
अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक रस्त्यावर मोठमोठे खड्डे डांबराने बुजवले नसल्याने खडे वाढत चालले आहेत, त्यामुळे अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागत आहे

खड्डे चुकवताना अपघात; अवसरी बुद्रुक येथील २ चुलत भावांचा मृत्यू, मंचर - शिरूर रस्त्यावरील घटना
अवसरी : मंचर शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द डिंभे उजव्या कालव्याजवळील रस्त्यावर पडलेली खडी, खड्डे चुकवताना मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. आकाश बाळासाहेब जाधव (वय २८) व मयूर संपत जाधव (वय २३) या दोन भावांची नावे आहेत. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे अवसरी गावावर शोककळा पसरली असून या दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी अवसरी ग्रामस्थ करत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश जाधव व मयूर जाधव हे चुलत भाऊ दुचाकीवरून मंचर येथून अवसरी फाटा मार्गे अवसरी बुद्रुक गावाकडे जात होते. उजव्या कालव्याच्या पुलालगत असणाऱ्या एका खड्ड्यांलगत दुचाकी जाऊन तेथील कठड्याला धडकली. स्थानिक नागरिकांनी दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच ते मृत्यू झाल्याचे घोषित केले. यातील तरूण आकाश जाधव याचा अवसरी बुद्रुक येथे लॉन्ड्री व्यवसाय असून मयूर जाधव हा अजित पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होता.
अपघाताची माहिती समजताच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन नातेवाईकांचे सात्वन केले . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे, भीमाशंकर कारखान्याची व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, अवसरी बुद्रुक गावचे उपसरपंच अनिल हिंगे पाटील आणि ग्रामस्थांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जाधव कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आकाश जाधव व मयूर जाधव यांच्या पाठीमागे आई-वडील भाऊ बहीण असा परिवार आहे.
अवसरी फाटा ते अवसरी शिक्रापूर रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी एक वर्षापूर्वी ४१८ कोटी रुपये मंजूर झाले आहे. काम घेतलेल्या संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण काम चालू केले नाही. मार्च महिन्यापासून अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक रस्त्यावर मोठमोठे खड्डे डांबराने बुजवले नसल्याने खडे वाढत चालले आहेत. संबंधित ठेकेदार या रस्त्याकडे फिरकतच नसल्याने संबंधित रस्त्याची देखभाल मॅनेजर पाहत आहे. अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक रस्त्याची चाळण झाली आहे संबंधित ठेकेदाराने मे महिन्यातच खड्डे डांबराने बुजवली नसल्याने रस्त्याच्या जागोजागी मोठे खड्डे पडले आहे. संबंधित ठेकेदाराने एक महिन्यापूर्वी सिमेंट मिश्रित खडी रस्त्यावर टाकली आहे भर पावसात सिमेंटच्या खडीचे खड्डे बुजवले असल्याने पावसाने सिमेंट वाहून गेले असुन खडी रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वारंवार मोटरसायकल चालक घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. आता तर संबंधित ठेकेदाराने कहरच केला असून खरच ज्या ठिकाणी अपघात होऊन दोन जण ठार झाले त्या रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुराळा उडत आहेत. संबंधित ठेकेदाराने जाधव कुटुंबाला मदत करावी अशी मागणी अवसरी ग्रामस्थांनी केली आहे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला समज देऊन तातडीने खड्डे बुजवण्यास सांगावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील काही दिवसात खड्डे न बुजवल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर व ग्रामस्थांनी दिला आहे.