विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख तरुणीला महागात; तब्बल ६ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:36 IST2025-12-01T12:36:20+5:302025-12-01T12:36:37+5:30
तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीला पैसे मागितले. तिने चोरट्याच्या खात्यात वेळोवेळी सहा लाख रुपये जमा केले

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख तरुणीला महागात; तब्बल ६ लाखांची फसवणूक
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख एका तरुणीला महागात पडली. विवाहाच्या आमिषाने चोरट्यांनी तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी रास्ता पेठेत राहायला आहे. तिने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. यानंतर चोरट्याने तिच्याशी संपर्क साधला. त्याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीला पैसे मागितले. तरुणीने चोरट्याच्या खात्यात वेळोवेळी सहा लाख रुपये जमा केले. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. त्याने मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची फसवणूक
व्हर्च्युअल मनीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची २१ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शुक्रवार पेठेत राहायला आहेत. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठवला होता. व्हर्च्युअल मनीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी महिलेची फसवणूक केली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सिंहगड रोड भागातील एका ज्येष्ठाची सायबर चोरट्यांनी नऊ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.