सासरच्या छळाला कंटाळून तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांकडून दुय्यम वागणूक; वडीलांनाही शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 12:07 PM2022-10-17T12:07:15+5:302022-10-17T12:13:00+5:30

उपोषणाचा इशारा देताच दाखल केला गुन्हा : बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यातील प्रकार 

A woman who went to file a complaint tired of being harassed by her father-in-law was abused by the police | सासरच्या छळाला कंटाळून तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांकडून दुय्यम वागणूक; वडीलांनाही शिवीगाळ

सासरच्या छळाला कंटाळून तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांकडून दुय्यम वागणूक; वडीलांनाही शिवीगाळ

Next

सांगवी (बारामती) : सासरच्या लोकांकडून गेल्या तीन वर्षांपासून होणाऱ्या छळाला कंटाळून एक महिलाबारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. त्या महिलेला दुय्यम वागणूक मिळून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. 

बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील माहेरी आलेल्या पीडितेवर सासरच्या छळाला कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पीडितेची दखल न घेता तिच्या वडिलांना पोलिसांकडून शिवीगाळ देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे माळेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत आपल्यावर होणाऱ्या अन्याया बाबत व पोलिसांकडून मिळालेल्या दुय्यम वागणुकी बाबत लोकमतशी बोलताना पीडितेने माहिती दिली. माळेगाव पोलिस किरकोळ तक्रारीबाबत देखील नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे देखील अनेक प्रकार समोर आले आहेत.

फिर्यादी महिलेची मावस नणंद ही पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. ती पीडितेच्या कुटुंबीयांचे कान भरवत वारंवार धमकी देत होती. तू कुठे ही गेलीस तरी कोणी काहीही करू शकत नाही. तसेच माळेगाव पोलिस ठाण्यातील ओळखीच्या पोलिसांना फोन करून पीडितेच्या दिराचे व जावेचे नाव फिर्यादीतून काढून प्रकरण जागेवरच दाबण्यासाठी पोलिसांना फोन येत असल्याचे महिलेने सांगितले.

सासरच्या लोकांकडून टेम्पो खरेदी करण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला होता. मात्र,माहेरची परिस्थिती बेताची असल्याने ती दहा लाख रूपये आणू शकली नाही. यामुळे विवाहितेला घराच्या बाहेर काढून तिला सातत्याने मारहाण करून उपाशी ठेवले जात होते. तसेच तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊन तिला मारहाण केली जात होती. मानसिक,शारीरिक त्रास देत छळवणूक करून घराच्या बाहेर काढल्याचा संतापजनक प्रकार घडून देखील पोलीस प्रशासन गांभीर्य घेत नव्हते. 

उलट महिलेच्या वडिलांना पोलिसांनी शिवीगाळ केली असल्याची माहिती वडिलांनी दिली. मात्र,पोलीस ठाण्यात गोंधळ घालून कपडे काढून उपोषण करण्याचा इशारा देताच पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शरद विलास काळे (पती), विलास आत्माराम काळे (सासरे),रंजना विलास काळे (सासु),अमित विलास काळे (दिर), शितल अमित काळे ( जाव) सर्व रा.हिंगणी (ता.खटाव,जि. सातारा) यांच्या विरोधात माळेगाव पोलिसांत चारित्र्यावर संशय, जाचहाट छळ करून उपाशीपोटी ठेवुन वारंवार शिवीगाळ दमदाटी केल्या बाबत गुन्हा नोंद केला आहे.

''या प्रकरणाची चौकशी करून याबाबत नक्कीच कायदेशीर कारवाई केली जाईल असे गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती) यांनी सांगितले आहे.'' 

''हे सर्व खोटे आहे. मुलीचे वडील दारुडे आहेत. त्याने पोलीस ठाण्यात खूप गोंधळ घातला, मुलीची फिर्याद देण्याची इच्छा नव्हती. परंतु मुलीचे वडील फिर्याद घ्या नाहीतर डोक्यावर घेईल असे मोठ-मोठ्याने ओरडत होता. - किरण अवचर (पोलीस निरीक्षक,माळेगाव पोलीस ठाणे)''

''माझ्या दोन लहान मुलांना घेऊन मी संसार वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यात महिना भरापासून धावपळ करत आहे. माझा दररोज छळ होत असताना मी माघारी घेण्याची भूमिका ठेवली होती. सासरकडून माझ्यावर उलटे आरोप करत मला नांदवण्यांची भूमिका नसल्याने मी तक्रार देण्याचा ठाम विचार केला होता. माझी मावस नणंद पुणे ग्रामीण पोलीस खात्यात आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी व मला न्याय मिळू नये म्हणून पोलिसांना वारंवार फोन करत होती. यामुळे पोलीस तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. - (चांदणी शरद काळे,पीडित महिला)'' 

Web Title: A woman who went to file a complaint tired of being harassed by her father-in-law was abused by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.