पार्टीत चेष्टेतून वाद पेटला; खडकवासल्यात एकाचा डोक्यात गोळी घालून खून, मृतदेह पुलाखाली फेकून दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 10:52 IST2026-01-15T10:51:02+5:302026-01-15T10:52:00+5:30
पार्टीत चेष्टेतून वाद पेटल्यावर तो विकोपाला गेला, त्यावेळी एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात गोळी घालून खून केला

पार्टीत चेष्टेतून वाद पेटला; खडकवासल्यात एकाचा डोक्यात गोळी घालून खून, मृतदेह पुलाखाली फेकून दिला
पुणे: पार्टीसाठी जमलेल्या चार-पाच मित्रांनी वादातून एका मित्राच्या डोक्यात गोळी घालून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह डोणजे (ता. हवेली) येथील पानशेत रस्त्यावरील पुलाखाली फेकून दिला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास खडकवासल्यातील कोल्हेवाडी येथे घडली. विशाल संजय चव्हाण (वय. २५, रा. कोल्हेवाडी किरकटवाडी, ता हवेली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खडकवासल्यातील कोल्हेवाडी येथे चार ते पाच मित्र रात्री पार्टीसाठी जमले होते. पार्टीत चेष्टेतून वाद पेटला, वाद विकोपाला गेल्यावर एका मित्राने विशाल चव्हाण यांच्या डोक्यात गोळी घातली. त्यामुळे विशालचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेल्या इतर मित्रांनी त्याचा मृतदेह डोणजे परिसरातील रस्त्याच्या पुलाखाली टाकून दिला. मृतदेहाची माहिती बुधवारी हवेली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष तोडकर, पोलिस हवालदार संतोष भापकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले. दरम्यान, हत्या नेमकी कोणी व कोणत्या कारणासाठी केली, याची माहिती अद्याप समोर आली नसून किरकोळ वादातून हत्या झाली असल्याचा संशय पुणे ग्रामीण पोलिस अपर अधीक्षक रमेश चोपडे यांनी व्यक्त केला आहे. त्याच्यावर पूर्वी काही गुन्हे दाखल असून, त्यासंदर्भानेही तपास होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घटना नांदेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोल्हेवाडीत घडली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे शहर पोलिस दलातील झोन तीनचे उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. नांदेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस आणि सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव पुढील तपास करीत आहेत.