मोटारीची धडक, अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू, मैत्रीण जखमी, मोटारचालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:28 IST2025-04-15T15:28:28+5:302025-04-15T15:28:38+5:30

पोलिसांनी अल्पवयीनांना दुचाकी चालविण्यास देणाऱ्या पालकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे

A biker has died after a car hit a bike in Yerwada | मोटारीची धडक, अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू, मैत्रीण जखमी, मोटारचालक फरार

मोटारीची धडक, अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू, मैत्रीण जखमी, मोटारचालक फरार

पुणे : भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने अल्पवयीन दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर घडली. या अपघातामध्ये दुचाकीचालकाची पाठीमागे बसलेली मैत्रिण जखमी झाली. याप्रकरणी येरवडापोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो अपघातानंतर पसार झाला आहे.

अली मोहम्मद शेख (वय १४, रा. अल कुरेश हाॅटेलमागे, कामराजनगर, येरवडा) असे अपघातामध्ये मृत्यु झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर हजरा मुजफ्फर अन्सारी (वय १२) असे जखमी झालेल्या त्यांच्या मैत्रीणीचे नाव आहे. याबाबत अलीचे वडील मोहम्मद गुलाब शेख (वय ४०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अली, त्याची मैत्रीण हजरा सोमवारी (१४ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास येरवडा भागातील एका जलतरण तलावात पोहोण्यासाठी जात होते. गोल्फ क्लब चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार अली आणि त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अलीचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध पोलिस घेत आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी गोल्फ क्लब चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केकाण तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलांना दुचाकी, तसेच चारचाकी गाड्या चालवण्यास देणे कायद्याने गुन्हा आहे. अनेक पालक मुलांना दुचाकी, मोटार चालविण्यास देतात. पालकांच्या बेजबाबदारपणामुळे गंभीर स्वरुपाच्या दुर्घटना घडतात. यापूर्वी पोलिसांनी अल्पवयीनांना दुचाकी चालविण्यास देणाऱ्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना दुचाकी व चारचाकी चालवण्यास देवू नये. - रवींद्रकुमार शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे

Web Title: A biker has died after a car hit a bike in Yerwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.