राँग साईडने आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकीला धडक; वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी, कल्याणीनगर भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:57 IST2026-03-05T16:56:37+5:302026-03-05T16:57:24+5:30
दुचाकीवरून वडील मुलगी दोघेच कल्याणीनगर भागातून जाताना बिशप स्कूल परिसरातील रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली

राँग साईडने आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकीला धडक; वडिलांचा मृत्यू, मुलगी जखमी, कल्याणीनगर भागातील घटना
पुणे : कल्याणीनगर भागात दुचाकीस्वाराच्या बेदरकारपणामुळे चालकाचा अपघातातमृत्यू झाला. राँग साईड आलेल्या दुचाकीस्वाराने वडील आणि सहप्रवासी मुलीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. मच्छिंद्र मोरे (वय ५५ ,रा. समता सोसायटी, वडगाव शेरी, मूळ रा. पोकुर्ले, ता. महाड, जि. रायगड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी कोमल मच्छिंद्र मोरे (वय २८) जखमी झाली. या प्रकरणी ओमकार घुमावत या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मच्छिंद्र मोरे यांची मुलगी रिना (वय २६) हिने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मच्छिंद्र मोरे आणि त्यांची मुलगी कोमल हे ३ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास कल्याणीनगर भागातून निघाले होते. त्यावेळी बिशप स्कूल परिसरातील रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार मच्छिंद्र मोरे आणि त्यांची मुलगी कोमल हे जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या मच्छिंद्र आणि त्यांची मुलगी कोमल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मच्छिंद्र यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत.