पुणे शहरात ३ महिन्यांत पोक्सोचे ५० तर विनयभंगाचे १४९ गुन्हे दाखल; काय होणे गरजेचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:56 IST2026-05-07T10:55:31+5:302026-05-07T10:56:11+5:30
पुण्यातील वाढती लोकसंख्या, बाहेरून येणारे लोंढे आणि वाढत्या शहरीकरणामुळे गुन्ह्यांच्या नोंदीत वाढ झाली आहे

पुणे शहरात ३ महिन्यांत पोक्सोचे ५० तर विनयभंगाचे १४९ गुन्हे दाखल; काय होणे गरजेचे?
पुणे : पुणे शहरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत बलात्कार पोक्सोचे ५० गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. हा आकडा दोन महिन्यांत आणखी वाढला असून, यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये ओळखीचे, नातेवाईक अथवा माहितीतीलच लोकांकडून हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. जानेवारी ते मार्च महिन्यात विनयभंगाचे १४९ गुन्हे दाखल असून, हा आकडा गेल्या दोन महिन्यांमध्ये आणखी वाढला आहे.
गेल्या दोन वर्षांतील प्रमुख प्रकरणे
शहरात दाखल बलात्कार, विनयभंग अथवा पोक्सोच्या गुन्ह्यांपैकी २०२४ मधील बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरण, २०२५ मधील स्वारगेट येथील बलात्कार प्रकरण आणि कोंढव्यातील बनावट बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. याव्यतिरिक्त २०२४ मध्ये विनयभंग केल्या प्रकरणाचे ८ ते ९, तर २०२५ मधील १२ ते १४ प्रकरणे गंभीर आहेत.
आकडेवारी काय सांगते ?
कालावधी - बलात्काराचे गुन्हे - न्यायालयात दोषारोपपत्र दाखल - फायनल - प्रलंबित गुन्हे
जानेवारी ते डिसेंबर २०२५ - २४० - २३८ - ०२ - ००
जानेवारी ते मार्च २०२६ - ४९ - ०४ - ०० - ४५
कालावधी - विनयभंगाचे गुन्हे - न्यायालयात दोषारोपपत्र दाखल - फायनल - प्रलंबित गुन्हे
जानेवारी ते डिसेंबर २०२५ - ६१३ - ६११ - ०२ - ००
जानेवारी ते मार्च २०२६ - १४९ - १३ - ०० - १३६
कालावधी - बलात्कार पोक्सोचे गुन्हे - न्यायालयात दोषारोपपत्र दाखल - फायनल - प्रलंबित गुन्हे
जानेवारी ते डिसेंबर २०२५ - २९९ - २९९ - ०० - ००
जानेवारी ते मार्च २०२६ - ५० - १४ - ०० - ३६
कालावधी - विनयभंग पोक्सोचे गुन्हे - न्यायालयात दोषारोपपत्र दाखल - फायनल - प्रलंबित गुन्हे
जानेवारी ते डिसेंबर २०२५ - २९७ - २९७ - ०० - ००
जानेवारी ते मार्च २०२६ - ६६ - १३ - ०० - ५३
माझा बाप असला म्हणून काय; फाशीची शिक्षा द्या
माझा बाप असला म्हणून काय झाले, त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी पर्वती परिसरात विकृत कृत्य समोर आल्यांनतर पीडितेच्या आईने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
डिजिटल पोर्नोग्राफीचा सुळसुळाट
इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या हिंसक आणि विकृत लैंगिक साहित्य, साईटस, रिल्स यामुळे मानवी संवेदना बोथट झाल्या आहेत. समाजात विकृती बळावत चालल्याचे हेदेखील एक प्रमुख कारण आहे. पोर्नोग्राफी साईट बंद करण्यात आल्याचे जरी सांगितले जात असले तरी काही साईटना बंदी नसल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे, मुंबई गुन्ह्यांचे हॉटस्पॉट
महाराष्ट्रात पुणे, मुंबई गुन्ह्यांचे 'हॉटस्पॉट' ठरत आहेत. पुण्यातील वाढती लोकसंख्या, बाहेरून येणारे लोंढे आणि वाढत्या शहरीकरणामुळे गुन्ह्यांच्या नोंदीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात सायबर सेलकडे अल्पवयीन मुलींच्या ऑनलाइन छळाशी संबंधितदेखील तक्रारी नोंदविल्या जात आहेत.
काय होणे गरजेचे
१. शाळांमध्ये 'लैंगिक शिक्षण' आणि पालकांशी मोकळा संवाद ही या विकृतीवरची पहिली लस आहे.
२. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपींना ३ ते ६ महिन्यांच्या आत शिक्षा मिळायला हवी.
३. सोशल मीडियाच्या वापराबाबत मुलींना आणि पालकांना अधिक सतर्क करावे लागेल.
४. अशा गुन्हेगारांना समाजातून वाळीत टाकणे आणि पीडितेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे.