Dhulivandan 2025: धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 14:49 IST2025-03-15T14:47:48+5:302025-03-15T14:49:27+5:30
६ हजार ११८ केसेस दाखल करून ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे

Dhulivandan 2025: धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई
पुणे: होळी व धुलीवंदनाच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर पुणेपोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांकडून यानिमित्त विशेष मोहिमेअंतर्गत ८ हजार ५५२ वाहनांची तपासणी करून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४०२ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे होळीचा सण आनंदी, सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा यासाठी शहरातील बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी शुक्रवारी (दि. १४) स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत ९० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. शहरातील ३७ वाहतूक विभाग व संबंधित पोलिस ठाण्यांकडून लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक (ट्रिपल सीट, राँग साईड, ड्रंक अँड ड्राईव्ह) यांच्यावर कारवाई करत ३८६ वाहने जप्त करण्यात आली. तसेच, ६ हजार ११८ केसेस दाखल करून ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
ड्रंक अँड ड्राईव्ह - ४०२
ट्रिपल सीट - ९२१
राँग साईड - ८५२
एकूण केसेस - ६ हजार ११८
दंडात्मक रक्कम - ५० लाख ९४ हजार