Pune: घरासमोर खेळताना विजेच्या खांबाला चुकून स्पर्श; पुण्यात शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:54 IST2025-05-21T09:54:18+5:302025-05-21T09:54:27+5:30
Pune Electric Shock News: परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही विजेच्या खांबांची खराब अवस्था आणि उघड्या वायरिंगबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र योग्य उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Pune: घरासमोर खेळताना विजेच्या खांबाला चुकून स्पर्श; पुण्यात शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे : पुण्यातील वारजे येथील रामनगर परिसरात सोमवारी संध्याकाळी विजेचा धक्का बसून दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मयंक उर्फ दादू प्रदीप अडागळे (वय १०, रा. रामनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयंक घरासमोर खेळत असताना तेथील लोखंडी विजेच्या खांबाला चुकून स्पर्श झाला. त्याच क्षणी त्याला जोरदार विजेचा शॉक बसला. आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर विजेचा खांब हा महावितरणच्या अखत्यारीत असून, अपघाताची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्वरित संपर्क साधण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही विजेच्या खांबांची खराब अवस्था आणि उघड्या वायरिंगबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र योग्य उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान घटना घडल्यानंतर वारजे पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. महावितरणकडूनही अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.