पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 23, 2025 20:57 IST2025-05-23T20:56:40+5:302025-05-23T20:57:16+5:30
जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. त्यांच्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू आहे

पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
पिंपरी :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू-सासरे, नवरा, दीर व नणंदेला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि रूपाली ठोंबरे-पाटील यांनी राज्याचे कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यामुळे हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली असून त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. त्यांच्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू आहे, एवढेच नाही तर सुपेकर हे जळगाव येथे कार्यरत असताना तेथील पोलिस उपनिरीक्षक अ. गो. सादरे यांनी सुपेकर यांनीच त्रास दिल्याचे पत्र लिहून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. त्या प्रकरणावरही पुढे पडदा पडला, अशी माहिती अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
दमानियांच्या पोस्टमध्ये नेमके काय?
वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा जालिंदर सुपेकर हे सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ करायचे. ही अशोक सादरे यांची सुसाइड नोट. अशोक सदरे यांचा जालिंदर सुपेकर यांनी दोन महिन्याच्या पैशाचे कलेक्शन दिले नाही म्हणून व दिवाळीचे सोने दिले नाही म्हणून अतोनात मानसिक छळ केला आणि त्यामुळे अशोक सदरे यांनीही आत्महत्या केली होती. इतकी बेकार माणसे आहेत, असे म्हणत दमानिया यांनी या पोस्टमध्ये @CMOMaharashtra व श्रीकर परदेशी यांना मी ही व ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती केली आहे.
या आधीही झाले होते फरार...
मयुरीने (राजेंद्र हगवणेच्या मोठ्या मुलाची पत्नी) जेव्हा तक्रार केली होती, तेव्हा तक्रारीवर सुद्धा हे लोक फरार होते, मग परत आले. त्यांना (मयुरीच्या कुटुंबाला) धमकावण्यात आले की, ‘तुम्ही आमचे काही बिघडवू शकत नाही’. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असून, त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झाला नाही. मलाही दोन मुली असून, अशा गंभीर अन् निर्घृण कृत्याचे समर्थन कोणताही बाप करूच शकत नाही. आरोपींना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्हायलाच हवी, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. - डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र