पिंपरी : निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरावलोकन मोहिमेमुळे प्रेमविवाह केलेल्या महिलांची कोंडी झाली आहे. २००२ च्या मतदार यादीतील आई-वडील आणि आजी-आजोबांच्या नोंदी शोधण्यासाठी अनेक महिलांना धावपळ करावी लागत असून, माहेरचा संपर्क तुटल्याने मतदानाचा हक्क टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
राज्यभरात सध्या मतदार यादी पडताळणी मोहीम सुरू असून, २०२४ च्या मतदार यादीची २००२ मधील मतदार नोंदीसोबत पडताळणी केली जात आहे. त्यामुळे तब्बल २२ वर्षांपूर्वीचे भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदारसंघाची माहिती शोधण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. विशेषतः प्रेमविवाह करून सासरी गेलेल्या २० ते ४० वयोगटातील महिलांना या प्रक्रियेत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी ही मोहीम राबविली जात असली, तरी जुन्या नोंदीच्या शोधात नागरिकांची मोठी दमछाक होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार, २००२ च्या मतदार यादीतील नोंदी किंवा पर्यायी १३ प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. अन्यथा मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विवाहानंतर नाव आणि पत्ता बदललेल्या महिलांना माहेरच्या नोंदीवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र अनेक प्रेमविवाहितांचा आई-वडिलांशी संपर्क तुटलेला असल्याने जुनी माहिती मिळविणे कठीण ठरत आहे. काही महिलांकडे लग्नापूर्वीची कागदपत्रे, मतदार यादीतील भाग क्रमांक किंवा अनुक्रमांक उपलब्ध नसल्याने पडताळणी प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.
जुन्या नोंदीचा शोध सुरू
मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदारसंघाची माहिती मिळवण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्याकडे नागरिकांची गर्दी वाढली आहे. गावोगावी जुनी मतदार यादी आणि मतदान नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे.
प्रेमविवाह केलेल्या अनेक मुलींचा माहेराशी वर्षानुवर्षे संपर्क नाही. त्यामुळे त्या माहिती देत नसल्याने आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या २००२ मधील मतदार नोंदी मिळत नाहीत. मग पडताळणी कशी करायची? - रीविशा दिवटे, बीएलओ
ही माहिती आहे आवश्यक :
- आई-वडिलांचे पूर्ण नाव
- लग्नापूर्वीचे नाव
- गाव, तालुका, जिल्हा
- २००२ मधील विधानसभा मतदारसंघ व क्रमांक
- २००२ मधील मतदार यादी भाग क्रमांक
- २००२ मधील अनुक्रमांक
Web Summary : Love-married women in Maharashtra face voter verification hurdles. The Election Commission's 2002 voter list verification creates issues as many lack access to parental records, risking disenfranchisement. Finding old data proves challenging, especially for those with strained family ties.
Web Summary : महाराष्ट्र में प्रेम विवाह करने वाली महिलाओं को मतदाता सत्यापन में बाधा आ रही है। चुनाव आयोग की 2002 की मतदाता सूची के सत्यापन से समस्याएँ पैदा होती हैं क्योंकि कई लोगों के पास माता-पिता के रिकॉर्ड तक पहुँच नहीं है, जिससे मताधिकार छिनने का खतरा है। पुराना डेटा ढूंढना चुनौतीपूर्ण साबित होता है, खासकर उन लोगों के लिए जिनके पारिवारिक संबंध तनावपूर्ण हैं।