पुणे :पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पुणेमेट्रो प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला. निगडीतील भक्ती-शक्ती चौक परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान लावण्यात आलेल्या लोखंडी शेडचे पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पडले. या घटनेत मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. कामगारांना सावली मिळावी यासाठी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. मात्र, दुपारी सुमारे तीनच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने या शेडचे लोखंडी पत्रे हवेत उडाले आणि रस्त्यावर कोसळले.
याचवेळी अनेक वाहनचालक महामार्गावरून प्रवास करत होते. एका दुचाकीस्वाराच्या अगदी समोर जोरात पत्रा पडल्याने तो काही क्षणासाठी घाबरला. सुदैवाने त्याने वेळीच वाहनावर नियंत्रण मिळवले. काही सेकंदांचा फरक पडला असता तर गंभीर अपघात होण्याची शक्यता होती.
या घटनेनंतर पुणे मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः वादळी वातावरणाचा अंदाज असतानाही तात्पुरत्या संरचनांची योग्य तपासणी करण्यात आली का, असा सवाल उपस्थित होत आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. स्थानिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिल्यानंतर रस्त्यावर पडलेले पत्रे हटविण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Web Summary : Pune Metro's negligence was exposed as strong winds caused iron sheets from a construction site to fall onto the Pune-Mumbai highway. Fortunately, no one was injured, but the incident raised serious safety concerns and disrupted traffic. An accident was narrowly averted, sparking questions about safety protocols.
Web Summary : पुणे मेट्रो की लापरवाही सामने आई क्योंकि तेज हवाओं के कारण निर्माण स्थल से लोहे की चादरें पुणे-मुंबई राजमार्ग पर गिर गईं। सौभाग्य से, कोई घायल नहीं हुआ, लेकिन घटना ने गंभीर सुरक्षा चिंताएं बढ़ा दीं और यातायात बाधित हो गया। एक दुर्घटना टल गई, जिससे सुरक्षा प्रोटोकॉल पर सवाल उठ रहे हैं।