शहराला पुरवलं जाणारं पाणी ‘सुरक्षित’ आहे का? पवना नदीपात्रातील घाण पाहून नागरिक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:52 IST2026-05-14T12:51:19+5:302026-05-14T12:52:29+5:30
- पुनावळेतील राम मंदिर घाटाजवळचा धक्कादायक प्रकार : प्लास्टिक पिशव्यांचाही खच; महापालिकेकडून अज्ञातांविरोधात गुन्हा; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू; दोषींना शोधण्याचे प्रयत्न

शहराला पुरवलं जाणारं पाणी ‘सुरक्षित’ आहे का? पवना नदीपात्रातील घाण पाहून नागरिक संतप्त
रावेत : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीपात्रात पुनावळे येथील राम मंदिर दशक्रिया घाटाजवळ जनावरांचे मांस आणि प्लास्टिक पिशव्यांचा खच आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये कचरा आणि मांस फेकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात महापालिकेने रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरवासीयांना नेमके कोणत्या दर्जाचे पाणी प्यावे लागत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका मावळ तालुक्यातील पवना धरणातून दररोज सुमारे ५५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. धरणातील पाणी पवना नदीमार्गे रावेत येथील बंधाऱ्यापर्यंत आणले जाते. त्यानंतर हे अशुद्ध पाणी निगडी-प्राधिकरण येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहराच्या विविध भागांना पुरविले जाते. मात्र नदीपात्रातच मोठ्या प्रमाणात मांस, चरबी आणि प्लास्टिक पिशव्या टाकल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पवना नदीपात्र आणि रावेत बंधाऱ्यात घाण टाकली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे सातत्याने येत होत्या. विशेषतः काही मांसविक्रेते उरलेले मांस, चरबी आणि अन्य टाकाऊ अवशेष पुनावळे गावाजवळील पुलावरून थेट नदीत फेकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने परिसराची पाहणी केली. या पाहणीत राम मंदिर घाटाजवळ तब्बल १२ पिशव्यांमध्ये जनावरांचे मांस आढळून आले.
याप्रकरणी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता पंकज धेंडे यांनी रावेत पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.११) फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली असून दोषींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
२३ एप्रिललाही सापडल्या होत्या ३० पिशव्या
यापूर्वी २३ एप्रिल रोजीही नदीपात्रात ३० पिशव्या आढळून आल्या होत्या. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून नदी परिसरात गस्त घालण्यात येते. वेळोवेळी दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र, तरीही नदी प्रदूषित करण्याचे प्रकार थांबत नाहीत.
पवना नदीपात्रात पुनावळे परिसरात वारंवार प्राण्यांचे अवशेष आणि मांस टाकले जात असल्याचा मुद्दा मी सभागृहात गंभीरपणे मांडला होता. त्यानंतर स्वतः महापौरांनी नदीपात्राची पाहणी करून पर्यावरण विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात ठोस कारवाई करण्याऐवजी पर्यावरण विभाग केवळ अज्ञातांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून जबाबदारी झटकत आहे. - रेश्मा भुजबळ, नगरसेविका
पवना नदीपात्रात प्राण्यांचे अवशेष आणि मांस टाकण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, याबाबत संबंधितांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. संवेदनशील ठिकाणी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. - पंकज धेंडे, उपअभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग