Pimpari-chinchwad : महसूल विभागात शिपाई करताहेत लिपकांची कामे;नियमांवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:47 IST2026-04-30T15:44:13+5:302026-04-30T15:47:06+5:30
- १०-१५ वर्षे एकाच ठिकाणी डेरा; शिपाईच करतात लिपिकांची कामे

Pimpari-chinchwad : महसूल विभागात शिपाई करताहेत लिपकांची कामे;नियमांवर प्रश्नचिन्ह
- सचिन ठाकर
पवनानगर : मावळ तालुक्यातील महसूल विभागात काही कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची आणि शिपायांकडून लिपिकीय स्वरूपाची कामे करून घेतली जात असल्याची चर्चा आहे. यामुळे बदली प्रक्रिया आणि कामकाजाच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
शासनाच्या नियमानुसार ठराविक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांची बदली अपेक्षित असते. मात्र, काही शिपाई आणि चालक अनेक वर्षे एकाच कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही ठिकाणी शिपायांकडून फाइल हाताळणी, नोंदी करणे किंवा कागदपत्रांशी संबंधित कामात साहाय्य घेतले जात असल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत लिपिकीय कामकाज शिपायांकडून करून घेणे नियमबाह्य असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्यामुळे स्थानिक पातळीवर संबंध दृढ होण्याची शक्यता असून, कामकाजात पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. महसूल विभाग हा नागरिकांशी थेट संबंधित असल्याने कामकाज नियमबद्ध आणि पारदर्शक असणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची पडताळणी करून आवश्यक ते उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महसूल विभागातील कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमबाह्य कामकाज थांबवावे, संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीची तातडीने अंमलबजावणी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमबाह्य कामकाज थांबवावे, संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीची तातडीने अंमलबजावणी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“शिपाई पदासाठी तीन वर्षांची बदली अट लागू होत नाही. काही ठिकाणी कामाचा ताण लक्षात घेऊन शिपायांकडून लिपिकांना साहाय्य घेतले जाते; मात्र अधिकृत लिपिकीय कामे देणे नियमबाह्य आहे. याबाबत चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.” - विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ