प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे पिंपरीगावातील क्रीडांगण बनले गोठा

By नारायण बडगुजर | Updated: April 26, 2026 19:21 IST2026-04-26T19:20:55+5:302026-04-26T19:21:22+5:30

- उद्घाटन रखडले : महापालिकेच्या स्थापत्य आणि क्रीडा विभागाचे एकमेकांकडे बोट; कुंपणाच्या तारा तोडल्या; मोकाट जनावरांचा वावर; सर्वत्र शेण; 'पवना' लगतच्या मैदानाचा विकास गेला वाया

pimpari-chinchwad due to lack of coordination in the administration, the playground in Pimprigao became a dump. | प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे पिंपरीगावातील क्रीडांगण बनले गोठा

प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे पिंपरीगावातील क्रीडांगण बनले गोठा

पिंपरी : पिंपरीगावातील पवनेश्वर मंदिराजवळील महापालिकेच्या क्रीडांगणाच्या कामात प्रशासनातील समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. स्थापत्य आणि क्रीडा विभाग एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. परिणामी उद्घाटन, लोकार्पण न होता क्रीडांगण वापराविना पडून आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.

पिंपरीगावात पवना नदीच्या काठावर क्रीडांगण विकसित करण्यात आले आहे. येथे जॉगिंग ट्रॅक, कुस्तीचा आखाडा उभारण्यात आला आहे. मात्र, क्रीडांगणाच्या एका बाजूला सुरक्षार्भितीऐवजी तारेचे कुंपण आहे. काही ठिकाणी तारा तोडण्यात आल्या आहेत. क्रीडांगणामध्ये भटक्या श्वानांचा आणि मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. क्रीडांगणात सर्वत्र जनावरांचे शेण पडलेले पहायला मिळत आहे.

क्रीडांगणामधील पाण्याच्या टाकीला झाकण गायब झाले आहे. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनामध्ये या क्रीडांगणाबाबत समन्यवयाचा अभाव आहे. स्थापत्य विभागाकडून क्रीडांगण विकसित करण्यात आले. क्रीडांगण क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत केले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, कामे अपूर्ण असून आम्ही आमच्या ताब्यात क्रीडांगण घेतलेले नाही, असे क्रीडा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींचे समस्या निवारणाकडे दुर्लक्ष

क्रीडांगणाचे काम पूर्ण करून समस्या सोडविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अतिक्रमण, स्मोकिंग झोन म्हणून होतो वापर

काही जणांकडून क्रीडांगणाचा गोम्यासारखा वापर केला जात आहे. जनावरे बांधून चारा व इतर साहित्य ठेवून अतिक्रमण केले आहे. काही जण धूम्रपानासाठी क्रीडांगणात येतात. सुरक्षारक्षक नियुक्त केलेले नाहीत. कुस्तीच्या आखाड्याची दुरवस्था झाली आहे.

क्रीडांगणामधील पाण्याच्या टाकीला झाकण नाही. झाकण नसल्यामुळे त्यामध्ये डासांची पैदास होत आहे. झाकणा नसल्यामुळे टाकीमध्ये पडून लहान मुलांना किंवा इतर कोणालाही अपघात होऊ शकतो. क्रीडांगणाचे काम पूर्ण करण्यात यावे. - सुहास कुदळे, पिंपरीगाव 

क्रीडांगणाचे काम झाल्यानंतर ते क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. संबंधित विभागांकडून सूचविण्यात आलेली कामे आमच्या विभागाकडून करून देण्यात येतील. - राजश्री सातळीकर, कनिष्ठ अभियंता, उद्यान स्थापत्य विभाग
 
क्रीडांगणाची काही कामे राहिली आहेत. एका बाजूला तारेचे कुंपण आहे. तेथे सुरक्षाभिंत उभारण्यासह इतर कामे करायची आहेत. गेल्यावर्षी तरतूद कमी असल्याने ही कामे राहिली आहेत. - विजय जाधव, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग
 
क्रीडांगणाच्या सुरक्षार्मितीचे काम करून द्यावे, स्वच्छतागृह उभारावे, सुरक्षारक्षकांसाठी कक्ष असावा, अशा विविध कामांबाबत संबंधित विभागाला पत्र दिले आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर क्रीडांगणाचा ताबा घेण्यात येईल.  पंकज पाटील, उपायुक्त, कीडा विभाग, महापालिका 

 

Web Title : समन्वय के अभाव में पिंपरी का खेल का मैदान बना गौशाला

Web Summary : पिंपरी का खेल का मैदान प्रशासनिक अराजकता का शिकार। विभाग जिम्मेदारी से बच रहे हैं, जिससे जगह बेकार पड़ी है। अधिकारियों की लापरवाही से पशु अपशिष्ट, टूटी हुई सुविधाएं और सुरक्षा खतरे हैं। निवासी निष्क्रियता पर निराशा व्यक्त करते हैं।

Web Title : Lack of coordination turns Pimpri playground into cattle shed.

Web Summary : Pimpri's playground suffers due to administrative disarray. Departments pass blame, leaving the space unused. Neglect by officials results in animal waste, broken facilities, and safety hazards. Residents express frustration over inaction.