चाकणमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत..! तब्बल ‘५’ घटनांनी नागरिक हादरले,आता थेट मर्सिडीज कंपनीत एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:09 IST2026-05-09T15:09:40+5:302026-05-09T15:09:52+5:30
leopard : चाकणमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत..! तब्बल ‘५’ घटनांनी नागरिक हादरले,आता थेट मर्सिडीज कंपनीत एन्ट्री

चाकणमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत..! तब्बल ‘५’ घटनांनी नागरिक हादरले,आता थेट मर्सिडीज कंपनीत एन्ट्री
चाकण : अडीच वर्षापूर्वी चाकण शहरात पकडलेला बिबट्या, पुणे-नाशिक महामार्गावर एका कंपनीत पकडलेला बिबट्या, औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत पकडलेला बिबट्या, मागील आठवड्यात चाकणलगतच्या आगरवाडी येथे पकडलेले दोन बिबटे आणि गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास एका कंपनीत दिसून आलेला बिबट्या यामुळे औद्योगिक क्षेत्रासह चाकण शहर परिसर हा बिबट्याप्रवण क्षेत्र होत आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील मर्सिडीज कंपनीत बिबट्याने एन्ट्री केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने कामगारवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याअगोदरच्या काळात देखील औद्योगिक क्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. त्यातील काही बिबट्यांचे रेस्क्यू करण्यात आले आहे; परंतु आजचा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला. त्यानंतर तो आढळून आला नाही. तरीदेखील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने कंपनी लगतच्या भागात पिंजरा लावला आहे. मागील अडीच वर्षांपूर्वी चाकण शहराच्या मध्यवर्ती भागात आलेला बिबट्या वनविभागाने पकडला होता. चाकण परिसरात बागायती भागात बिबट्याचा वावर वाढत आहे.
परिसरात बिबट्यांना लपण्यासाठी जागा
याबाबत वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले की, चाकण परिसरात बिबट्याचा वावर वाढतो आहे हे नक्की आहे. यापूर्वीही बिबटे चाकण शहरात व परिसरात पकडण्यात आलेले आहेत. परिसरातील शेतात व नदी-खोऱ्याच्या परिसरात बिबट्यांना लपण्यासाठी जागा आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर तिथे असतो.