हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार;‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:32 IST2026-04-30T13:32:17+5:302026-04-30T13:32:27+5:30

- हिंजवडी आणि माण आयटी पार्क परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

hinjewadi rain If Hinjewadi collapses again, officials will be held responsible; PMRDA Commissioner warns | हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार;‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांचा इशारा

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार;‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांचा इशारा

पिंपरी : पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पाणी साचल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस आता थेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. नियोजनाअभावी पाणी साचल्यास किंवा कोणतीही आपत्ती ओढवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत’ जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात बुधवारी (दि. २९ एप्रिल) आयोजित पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ३१ मे २०२६ पूर्वी सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. हिंजवडी आणि माण आयटी पार्क परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

हा प्रश्न सोडवण्यासाठी बैठका नकोत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, असे स्पष्ट करत महानगर आयुक्तांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), एमआयडीसी, पीएमआरडीए, संबंधित ग्रामपंचायती आणि पाटबंधारे विभाग यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. विशेषतः प्रमुख नाले आणि आयटी पार्कमधील अंतर्गत रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी एकमेकांवर जबाबदारी न ढकलण्याबाबत त्यांनी बजावले.

या बैठकीला पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहआयुक्त पूनम मेहता, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक) राहुल सोनवणे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कालिदास मांडेकर, अधीक्षक अभियंता नीलेश मोढवे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. दुबल यांच्यासह जिल्हा परिषद, वनविभाग आणि ‘एनएचएआय’चे वरिष्ठ अधिकारी तसेच हिंजवडी व माण येथील ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. 

पावसाळापूर्व कामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. जर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा नियोजनाअभावी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली, तर संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई निश्चित केली जाईल.  - डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: hinjewadi rain If Hinjewadi collapses again, officials will be held responsible; PMRDA Commissioner warns