उत्तरप्रदेशातून येऊन घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; तीन संशयितांना बेड्या, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 21:00 IST2025-12-10T21:00:20+5:302025-12-10T21:00:56+5:30
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दुचाकी टेम्पोमध्ये ठेवून पुन्हा उत्तरप्रदेश येथे जात होते

उत्तरप्रदेशातून येऊन घरफोड्या करणारी टोळी जेरबंद; तीन संशयितांना बेड्या, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : उत्तरप्रदेशातून शहरात येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या. एकाच दिवशी केलेल्या चार घरफोडीच्या गुन्ह्यांची ४८ तासात उकल झाली. संशयितांकडून १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोसीन शौकतअली शेख (वय ३२), उदयवीर मलखानसिंग सहासी (३६), विनय कुमार गंगासरन (३४, तिघे रा. मेरठ, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने युनिट तीनच्या पथकाकडून तपास सुरू होता. दरम्यान, पुणे- नाशिक महामार्गाजवळ वाकी, चाकण परिसरातून गुन्हेगार जाणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता एका टेम्पोमध्ये एक विना क्रमांकाची दुचाकी ठेवून तिघे संशयित जात असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
संशयितांनी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी केलेल्या चार घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला टेम्पो, दुचाकी, एक मोबाईल फोन, इतर साहित्य तसेच सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १२ लाख १३ हजार ५९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे, उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे, अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, संदीप सोनवणे, मनोज साबळे, ऋषिकेश भोसुरे, अजित रुपनवर, स्वप्नील महाले, योगेश कोळेकर, शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, समीर काळे, सुधीर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, राजकुमार इघारे, निखील फापाळे, प्रदीप राळे, तांत्रिक विश्लेषक प्रकाश ननावरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी टेम्पोत ठेवली दुचाकी
संशयित हे उत्तरप्रदेशातून टेम्पोमध्ये दुचाकी घेऊन शहरात आले. त्यानंतर टेम्पो निर्जनस्थळी पार्क करून दुचाकीवरून शहरात घरफोड्या केल्या. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दुचाकी टेम्पोमध्ये ठेवून पुन्हा उत्तरप्रदेश येथे जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले.