'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:30 IST2025-11-19T18:29:25+5:302025-11-19T18:30:09+5:30
वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे

'ॲक्सिडेंट झोन’ बनलेल्या आयटी पार्कमध्ये ११ महिन्यांत ३६ मृत्यू; अवजड वाहनांची घुसखोरी वाढली
पिंपरी : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरात वाढत्या अपघातांमुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे. यात भर म्हणून, प्रवेशबंदीच्या वेळेतही जड-अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, मागील ११ महिन्यांत हिंजवडी आणि वाकड परिसरात झालेल्या अपघातांमध्ये ३६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गुन्हे आणि दंडवसुली
वाढते अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. प्रवेशबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५९ हजार १९६ जड, अवजड वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईतून सहा कोटी ६७ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.
आरएमसी प्रकल्प चालकांना नोटीस
वाढते अपघात रोखण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. बंदीच्या वेळेत जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही यासाठी परिसरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प चालक आणि मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीची कारणे
हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये १३० हून अधिक नामांकित कंपन्या असून, दररोज तीन ते चार लाख नागरिक येथून ये-जा करतात. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. आयटी अभियंते हिंजवडीसह वाकड, रावेत, पुनावळे, ताथवडे परिसरात राहत असल्याने या भागांत मोठ-मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. या बांधकामासाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्या आरएमसी प्रकल्पांची संख्याही अधिक आहे, ज्यामुळे बांधकाम साहित्याची जड वाहतूक वाढली आहे.
हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सांगितले की, परिसरात वाहनतळाची व्यवस्था नाही, त्यामुळे वाहने रस्त्यावरच थांबतात. रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून आणि महामेट्रोचे काम संपल्यावर राडारोडा (कचरा) तत्काळ हटवणे आवश्यक आहे.
वाकड वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक मधुकर थोरात यांनी माहिती दिली की, सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असतानाही चालक नियम मोडत आहेत. यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
विभागनिहाय आकडेवारी (१ जानेवारी ते १८ नोव्हेंबर २०२५)
विभाग अपघातांची संख्या मृत्यू बंदी उल्लंघन गुन्हे वसूल केलेला दंड (रुपयांमध्ये)
हिंजवडी ५८ १५ ५३,२१८ ५ कोटी ९४ लाख ५३ हजार ६५०
वाकड ७१ (३१ ऑक्टो. २०२५ पर्यंत) २१ ५,९७७ ७३ लाख ६ हजार ८५०