ताऱ्यांशी जवळीक साधणारी 'केप्लर दुर्बीण', जाणून घ्या खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:38 PM2019-03-07T16:38:08+5:302019-03-07T17:02:06+5:30

7 मार्च रोजी नासाने सर्वात शक्तिशाली केप्लर दुर्बीण लाँच केली होती. सूर्यमालेच्या बाहेर सूर्यासारख्या इतर ताऱ्यांभोवती फिरणारे पृथ्वीशी मिळतेजुळते परग्रह शोधणे हा दुर्बिणीचा मुख्य हेतू आहे. या दुर्बिणीसंदर्भातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

केप्लर दुर्बिणीने अनेक संभाव्य बाह्यग्रहांचा शोध लावला. जुलै 2016 पर्यंत केल्पर दुर्बिणीने 2453 परग्रहांचा शोध लावला आहे. केप्लरने सतत 9 वर्षे 242 दिवस उत्तम सेवा दिली.

नासा या अवकाश संशोधन संस्थेने 478 किलोग्रॅम वजनाचे केप्लर अवकाशात सोडले होते. त्याचा व्यास सुमारे एक मीटर आणि आकार जेमतेम 0.7 मीटर चौरस मीटर आहे. त्याने 'हेलिओ-सेंट्रिक' म्हणजे सौर केंद्रीय कक्षेत परिभ्रमण करायला सुरुवात केली होती.

केप्लरला सुरुवातीला आकाशगंगेचा पृथ्वीवरून 'दिसणारा' छोटा पट्टा नेमून दिला होता. तो सिग्नस आणि लायरा नक्षत्रांच्या मधला होता. केप्लर जरी सेवानिवृत्त झाले असले, तरी नवीन प्रकारची यानं अशाच कामगिरीवर पाठवली जात आहेत.

केप्लर ही दुर्बीण तयार करण्यासाठी 60 कोटी डॉलर खर्च करण्यात आला होता. प्रसिद्ध खगोलतज्ञ जोहनस केप्लर यांच्या नावावरून या दुर्बिणीला केप्लर हे नाव देण्यात आले आहे.

पृथ्वीप्रमाणे अन्य ग्रहांचा शोध घेण्यासाठी नासाने 7 मार्च 2009 मध्ये केप्लर दुर्बीण लाँच केली. मात्र 9 वर्षांनंतर दुर्बिणीची दोन दिशानियंत्रिक चाके तुटल्याने तिचे काम थांबण्यात आले. कार्यक्षम ठेवणारं इंधन संपुष्टात आल्याने नासाने गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला ही दुर्बीण सेवानिवृत्त करण्याची घोषणा केली.