Rupali Patil Thombare : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन, राष्ट्रवादीत प्रवेश, आता एकच ओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:58 PM2021-12-17T16:58:24+5:302021-12-17T17:12:11+5:30

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare Joining NCP) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात पक्षाच्या महिला आघाडीला बळ मिळालं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर, रुपाली पाटील यांनी आपल्या फेसबुकचे प्राफाईल बदलले असून राष्ट्रवादी पक्षच का निवडला, याचे कारणही सांगितले.

मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्री म्हणून चांगलं ओळखते. गेल्या 10 वर्षांपासून ते आहेत, आताही ते पालकमंत्री आहेत. पुण्याचे अनेक पालकमंत्री मी पाहिलेत, गिरीश बापट पाहिलेत, चंद्रकांत पाटील बघितलेत. पण, अजित पवारांचा काम करण्याचा बडगा अप्रतिम आहे.

मी दुसऱ्या पक्षाची असतानाही, माझं काम मार्गी लावण्याची त्यांची वृत्ती अतिशय चांगली आहे. तसेच, अजित पवार यांनी जो विश्वास आणि शब्द दिलाय, आत्ताच त्यांनी भाषणात बोलूनही दाखवलं. त्यामुळेच, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत योग्य ती जबाबदारी आणि योग्य तो सन्मान मला अजित पवार देतील. माझ्यातील आक्रमकता कायम राहिल, मी ती उसनी आणलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले.

साहेब, इथं कर आमुची जुळती ! साहेब, बळ द्या तुमच्या लेकीला लढायला, नव्या संघर्षाला तुमच्या साक्षीने सुरुवात करते, असे ट्विट त्यांनी फोटो शेअर करत केलो होते,

राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीची ओढ लागल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.