अनिल देशमुख यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या जयश्री पाटील आहेत कोण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 08:12 AM2021-04-06T08:12:16+5:302021-04-06T08:22:24+5:30

Adv. Jayashree Patil : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामध्ये अॅड. जयश्री पाटील यांच्या तक्रारीची आणि याचिकेची भूमिका निर्णायक ठरली होती. या याचिकेवर सुनावणी करतानाच हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपावर सुनावणी करताना हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय काल दिला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेचा हवाला देत गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामध्ये अॅड. जयश्री पाटील यांच्या तक्रारीची आणि याचिकेची भूमिका निर्णायक ठरली होती. या याचिकेवर सुनावणी करतानाच हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यापूर्वी मराठा आरक्षण खटल्यातही त्यांचे नाव चर्चेत आले होते. आज आपण जाणून घेऊयात अॅड. जयश्री पाटील यांच्याविषयी.

जयश्री पाटील यांचं नाव मराठा आरक्षण खटल्याच्या निमित्ताने प्रथम चर्चेत आले होते. स्वत: मराठा समाजातल्या असल्या तरी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता. गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती.

जयश्री पाटील ह्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. तसेच दीर्घकाळापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.

मानवाधिकारांसंदर्भातील कामांसाठीही त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. तसेच मानवाधिकारांसंदर्भातील विविध पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. तसेच मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.

१०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देतानाच १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

हायकोर्टाने दिलेल्या आदेशांनंतर जयश्री पाटील यांनी आनंद व्यक्त केला होता. तसेच अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल करताना कायदा आणि घटनेपेक्षा तुम्ही मोठे नाहीत, असा टोला लगावला होता.