न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास

By कुणाल गवाणकर | Published: November 2, 2020 05:53 PM2020-11-02T17:53:50+5:302020-11-02T17:57:42+5:30

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. नाव मागे घेण्याचा कालावधी संपताच निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

विशेष म्हणजे आज भाजप आणि काँग्रेसनं एकाच वेळी इतिहास रचला आहे. आज भाजपनं राज्यसभेच्या ८ जागा जिंकल्या. तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली.

उत्तर प्रदेशातून भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, अरुण सिंह, माजी डीजीपी बृजलाल, नीरज शेखर, हरिद्वार दुबे, गीता शाक्य, बीएल शर्मा आणि सीमा द्विवेदी हे ८ जण निवडून गेले आहेत.

समाजवादी पक्षाकडून राम गोपाल यादव, तर बहुजन समाज पक्षाकडून रामजी गौतम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.

आजच्या विजयामुळे भाजप राज्यसभेतला आपला सर्वोच्च आकडा गाठला आहे. तर काँग्रेसची अवस्था सर्वात वाईट झाली आहे.

२५ नोव्हेंबरला राज्यसभेच्या १० सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये भाजपच्या ३, समाजवादी पक्षाच्या ४, बसपच्या २ तर काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपकडे ९ उमेदवारांना विजयी करता येईल इतकं संख्याबळ होतं. मात्र त्यांनी एक उमेदवार कमी दिला.

भाजपनं टाकलेल्या डावानं सगळ्यांनाच धक्का बसला. यावरून प्रचंड राजकारण झालं. बसप आणि भाजपनं हातमिळवणी केल्याचा आरोप सप आणि काँग्रेसनं केला.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ११ जागांचे निकाल स्पष्ट झाल्यानं भाजपनं राज्यसभेत शिखरावर आहे. तर काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

एकूण २४५ सदस्यसंख्या असलेल्या राज्यसभेत आता भाजपचे ९२ सदस्य आहेत. भाजपच्या मित्रपक्षांचा आकडा लक्षात घेतल्यास ही संख्या ११२ वर जाते. त्यामुळे एनडीए बहुमतापासून ११ जागा दूर आहे.

राज्यसभेतील काँग्रेसची स्थिती आणखी दयनीय झाली आहे. सदनात काँग्रेसचे ३८ सदस्य आहेत.