नेमबाज सौरभची अविश्वसनीय भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 12:24 PM2018-08-21T12:24:43+5:302018-08-21T13:03:51+5:30

सौरभ चौधरीने वरिष्ठ स्तरावर पहिलेच पदक जिंकले. मागील वर्षभरात उत्तर प्रदेशच्या या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धांवर वर्चस्व गाजवले आहे. त्याने आशियाई स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल गटाच बाजी मारली.

डिसेंबर 2017 मध्ये सौरभने 10व्या आशियाई युवा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकून युवा ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. 2018च्या या युवा स्पर्धेची पात्रता मिळवणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला.

2017च्या केएसएस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 15 वर्षीय सौरभने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम लढतीत दिग्गज जितू रायला पराभवाचा धक्का दिला होता. त्याच स्पर्धेत त्याने कनिष्ठ व युवा गटाचे रौप्यपदकही जिंकले होते.

2017च्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत त्याने भारतीय संघासोबत कांस्यपदक जिंकले होते, तर वैयक्तिक गटात त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

जर्मनीत कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत त्याने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण जिंकले होते. त्याने 243.7 गुणांची कमाई करताना हे पदक जिंकले होते. चायनीज तैपेईच्या वँग झेहाओ ( 242.5) याच्या नावावर कनिष्ठ गटाचा विश्वविक्रम होता. याच स्पर्धेत त्याने मिश्र सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते.