जोशीमठातील जमीन खचण्याचं सत्य समोर आलं; IIT संशोधकांचा हैराण करणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 02:02 PM2023-01-09T14:02:32+5:302023-01-09T14:06:57+5:30

उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये खचलेल्या जमिनीबाबत मोठा दावा समोर आला आहे. या घटनेच्या काही दिवस आधी IIT कानपूरची रिसर्च टीम त्याच ठिकाणी पोहोचले होते. या टीमचं भूवैज्ञानिक प्रा. राजीव सिन्हा यांनी नेतृत्व केले. या काळात या पथकाने महत्त्वपूर्ण सर्वेक्षण केले होते.

प्रा. राजीव सिन्हा यांनी स्पष्टपणे सांगितले की, जोशीमठच्या पुनर्वसनाबद्दल बोलणे धोक्याचे आहे. सध्या तिथे राहणे अजिबात योग्य नाही. शास्त्रज्ञांच्या पथकाने सर्वेक्षणादरम्यान काय पाहिले? अखेर जोशीमठात जमीन का खचली? आता जोशीमठ लोकांना राहण्यासाठी योग्य जागा नाही असं संशोधक का म्हणत आहेत? याची सगळी उत्तरं रिपोर्टमध्ये मिळतील. तत्पूर्वी जोशीमठात काय घडलंय हे पाहू.

डिसेंबरपासून जोशीमठमध्ये भूस्खलनाच्या घटना समोर येऊ लागल्या. गेल्या महिन्यात या भागात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. शहरातील मनोहर बाग वॉर्ड, गांधी वॉर्ड आणि सिंधार वॉर्डात घरांना तडे गेल्याची माहिती लोकांनी दिली होती. शहर परिसरात घरांसह शेतजमिनीही दरड कोसळल्याने बाधित झाल्या आहेत. येथे शेतात मोठमोठ्या भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी शेतातील भेगा एक फुटापर्यंत रुंद झाल्या आहेत.

या घटनांनंतर प्रशासनही सतर्क आले असून चमोली जिल्हा प्रशासनाने संयुक्त पथक तयार केले आहे. या पथकाने दोन दिवस शहरातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या घरांची पाहणी केली. तहसील प्रशासन, नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त पथकाने घरोघरी जाऊन बारकाईने पाहणी केली. जोशीमठ शहरात सुमारे दोन हजार घरे आहेत. रविवारपर्यंत भूस्खलनामुळे ६०० हून अधिक घरांना तडे गेले होते.

भूस्खलनाची मालिका सोमवारी रात्री समोर आली जेव्हा अचानक अनेक घरांना मोठ्या भेगा पडल्या. यानंतर संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले. मारवाडी वॉर्डातील जेपी कंपनीच्या निवासी वसाहतीमधील अनेक घरांमध्ये तडे गेले. रात्रीच कॉलनीमागील टेकडीवरून अचानक पाणी झिरपू लागले. बद्रीनाथ महामार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर रहिवासी इमारतींनाही किरकोळ भेगा पडल्याचे दिसून आले. भूस्खलनामुळे ज्योतेश्वर मंदिर आणि मंदिर परिसरात भेगा पडल्या.

सिंहधर वॉर्डातील बहुमजली हॉटेल माउंट व्ह्यू आणि मलारी इन जमीन खचल्यामुळे तिरके झाले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मागील सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या भिंतींना तडे गेल्याचे आवाज येऊ लागले, त्यामुळे या हॉटेलच्या मागे राहणारे पाच कुटुंबातील लोक घाबरले.

जोशीमठमध्ये मंगळवारी दरड कोसळण्याची घटना घडली. मंगळवारी जोशीमठ खडकातून पाणी झिरपताना स्थानिकांनी पाहिले. जमिनीतून बाहेर पडणारे पाणी शेताच्या भेगांमध्ये शिरत असल्याने धोका आणखी वाढला आहे. मंगळवारी शहरातील नऊ वॉर्डांतील एका-एका घरात भेगा पडल्या. येथून प्रशासनाने मंगळवारी पाच बाधित कुटुंबांचे स्थलांतर केले, तर अनेक बाधितांनी घरे सोडली.

जमिनी का खचत आहेत? यावर भूवैज्ञानिक डॉ. राजीव सिन्हा म्हणाले की, जोशीमठ घटनेच्या काही दिवस आधी आम्ही तिथे होतो. जोशीमठ परिसराचे ड्रोन सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल आता तयार केला जात आहे. जोशीमठ येथील जमीन खचण्याचे मुख्य कारण म्हणजे 'जोशीमठ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर धोक्याने भरलेला आहे. या जमीन land sliding झोनमध्ये आहे.

अनेक दशकांपासून येथे लँड स्लाइडिंग होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ते स्थिर राहिले आहे. वारंवार भूस्खलनामुळे येथील खडक कमकुवत झाले आहेत. असे असतानाही या ढिगाऱ्यावर लोकांनी घरे, हॉटेल्स बांधली आहेत. गेल्या काही वर्षांत याठिकाणी बरीच विकासकामे झाली आहेत. आता पुन्हा एकदा जमीन सरकत आहे. त्यामुळे आतून ढिगारा सरकत असून जमीन खचू लागली आहे असं त्यांनी म्हटलं.

खोऱ्यात नदीच्या किनारी मोठी लोकसंख्या वसली आहे. ते धोकादायक आहे. नियोजन नसलेली विकासकामे केल्यानं आता लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. जर वेळीच सुधारले नाहीत तर भयानक स्थिती पाहायला मिळू शकते. जर विना भूकंप अथवा पाऊस जमीन खचत असेल तर अंदाज लावा, जर पाऊस झाला अथवा भूकंप आला तर याठिकाणी उद्रेक होईल असं राजीव सिन्हा म्हणाले.