देशात कोरोनाची चौथी लाट येणार का आणि मंकीपॉक्स किती संसर्गजन्य?; तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:55 PM2022-05-26T20:55:39+5:302022-05-26T21:04:35+5:30

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 52 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 529,901,197 वर पोहोचली आहे. तर 6,306,755 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,628 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 5,24,525 लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना देशात कोरोनाची चौथी लाट येणार का आणि मंकीपॉक्स किती संसर्गजन्य? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

देशात ओमायक्रॉन सब व्हेरियंट BA.4 चं पहिलं प्रकरण आढळून आलं आहे. कोरोनाच्या या प्रकारामुळे अनेक देशांमध्ये संसर्गाची नवी लाट आली आहे. त्यानंतर देशात चौथ्या लाटेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

देशातील लसीकरणावरील राष्ट्रीय सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी चौथ्या लाटेची शक्यता फेटाळून लावली आहे. त्याच वेळी, त्यांनी मंकीपॉक्सचे कोविडसारखे संसर्गजन्य किंवा गंभीर असल्याचं म्हटलेलं नाही.

ओमायक्रॉन सब-व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे भारतात आढळली आहेत. त्यानंतर केंद्र सरकार कोरोनाच्या या सर्व प्रकारांबाबत सतर्क झाले आहे. तर मंकीपॉक्समुळे लोकांमध्ये भीती आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नॅशनल टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी मंगळवारी सांगितले की, या नवीन सब व्हेरिएंटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

डॉ जयदेवन यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटची प्रकरणे खूप वेगाने वाढली आहेत. ते म्हणाले की दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवावरून असे दिसून येते की जर आपण पुरेशी खबरदारी घेतली तर या दोन्ही प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणावर कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

काही देशांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्वांना वाढत्या संसर्गाचा सामना करण्यासाठी मर्यादित लसीकरण सुरू करण्यास सांगितले आहे.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 237 संशयित संक्रमित आढळले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासून 19 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इंग्लंडमध्ये 14 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे येथील बाधितांची संख्या 70 वर पोहोचली आहे. UAE मध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. दुसरीकडे, जर्मनीने मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून 40,000 लसीचे डोस तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरस वेगाने पसरत आहे. याच दरम्यान, एक दिलासादायक माहिती समोर आली आहे, या धोकादायक आजारावर उपचार करता येणार आहेत. या आजारात अँटीव्हायरल औषधे आराम देऊ शकतात, असं लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आलं आहे.

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत करतात. हा रिसर्च लिव्हरपूल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट, ब्रिटन येथे करण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनाच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन 2018 ते 2021 दरम्यान युनायटेड किंगडममधील मंकीपॉक्सच्या 7 रुग्णांवर करण्यात आले. या 7 रुग्णांपैकी 3 रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून आले होते आणि उर्वरित चार रुग्णांमध्ये संसर्ग एकातून दुसऱ्यामध्ये पसरला होता.

रुग्णांवर दोन औषधांचा वापर करण्यात आला. ही औषधे Brincidofovir आणि Tecovirimat आहेत. पहिल्या औषधाचा वापर करूनही रुग्णांना फारसा फायदा झाला नाही. हे औषध तीन रुग्णांवर वापरले गेले. औषध घेतल्यानंतर या रुग्णांच्या लिव्हरच्या एन्झाइमची पातळीही थोडीशी खालावली. सर्व रुग्ण काही वेळाने बरे झाले.

2021 मध्ये, युनायटेड किंगडममधील एका रुग्णामध्ये दुसरे औषध Tecovirimat वापरले गेले, हा रुग्ण लवकर बरा झाला आणि दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोकाही कमी झाला. संशोधकांना असे आढळून आले आहे की मंकीपॉक्स व्हायरस रक्तात आणि लाळेमध्ये देखील आढळून आले आहेत.

या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की याआधी मंकीपॉक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच पसरला नव्हता. पण तरीही त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका कमी आहे. याशिवाय, कमी लोकांवर केलेल्या अभ्यासामुळे, संशोधकांनी कोणतेही अँटीव्हायरल औषध वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.