Gujarat Election Result 2022: अवघा देश जिंकून मोदी, शाह त्यांच्याच गावात हरले होते; काँग्रेसकडून खेचून आणले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 04:30 PM2022-12-08T16:30:03+5:302022-12-08T16:36:45+5:30

लोकसभा, विधानसभा जरी जिंकल्या तरी गावात पराभव झाल्याने मोदी शाहंच्या जिव्हारीही लागले होते. पण एका मतदारसंघात दहा वर्षे, दुसऱ्या पाच वर्षे थांबण्याशिवाय पर्य़ाय नव्हता...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विजय मिळविला आहे. भाजपाने दोन-चार राज्ये सोडली तर अवघा देश व्यापला होता. परंतू याच मोदी शहांना गुजरातमधील मूळ गाव राखता आले नव्हते. २०१७ मध्ये तिथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. लोकसभा, विधानसभा जरी जिंकल्या तरी गावात पराभव झाल्याने जिव्हारीही लागले होते. ते दोन्ही मतदारसंघ भाजपाने पुन्हा खेचून आणले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गाव वडनगर आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गाव मानसा पुन्हा भाजपाच्या ताब्यात आले आहे. तिथे पुन्हा कमळ खुलले आहे. दोन्ही मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसचा विजय झाला होता. यासाठी शहा आणि आरएसएसने मिळून वेगळी रणनिती आखली होती.

वडनगरचा मतदारसंघ उंझामध्ये भाजपाचे किरीट पटेल आणि मानसाहून जयंती पटेल निवडून आले आहेत. किरीट पटेल हे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे जवळचे आहेत. भाजपाच्या नेत्यांमध्ये या जागेवर उमेदवारी मिळविण्यावरून गटबाजी सुरु झाली होती.

मतभेदांचा फटका पुन्हा बसला असता म्हणून अखेर किरीट पटेल यांना उमेदवारी देमअयात आली होती. यामुळे गटबाजी थांबली. भागवतांचाच माणूस असल्याने आरएसएसच्या स्वयंसेवकांनी देखील प्रचारात उडी घेतली होती. याचा परिणाम असा झाला की ही जागा पुन्हा ताब्यात आली.

उंझामध्ये १९९५ पासून भाजपाच जिंकत होती. मात्र २०१७ मध्ये काँग्रेसच्या डॉ. आशा पटेल यांनी भाजपाच्या नारायण लल्लूदास यांचा पराभव केला आणि भाजपला मोठा आघात केला होता. महत्वाचे म्हणजे गेल्या ५० वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसविरोधी पक्षच जिंकत होते. आधी जनता दल होते, आता भाजपा.

अमित शहांचे गाव मानसाची तर वेगळीच स्टोरी होती. गेल्या दोन विधानसभांना तिथे काँग्रेसचा उमेदवार जिंकून येत होता. शहांनी कैक प्रयत्न केले होते. परंतू यश काही येत नव्हते. यावेळी शहांनी उशिरानेच उमेदवाराची घोषणा केली. अनेक जणांकडून चौकशी करून, कोणता उमेदवार चालेल आदी गोष्टींचा अभ्या करून शहांनी जयंतीभाई पटेल यांना उभे केले होते. भाजपाला पाटीदार आणि ठाकोर समाजाची बहुतांश मते मिळाली आणि निकालच फिरला.