PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल

By Rishi Darda | Published: May 12, 2024 06:01 AM2024-05-12T06:01:47+5:302024-05-12T06:03:59+5:30

PM Narendra Modi Exclusive Interview to Lokmat: ज्या पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यांना पुन्हा स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावासा का वाटत आहे?,असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. तर, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मात्र त्यांचा वारसा सांगणारे लोक त्यांच्या तत्त्वांना हरताळ फासत आहेत. बाळासाहेबांना हे रुचले असते का? अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

pm narendra modi exclusive interview to lokmat discussed evolving politics maharashtra politics rahul gandhi and congress uddhav thackeray sharad pawar eknath shinde shiv sena ncp pivotal policies post election agenda | PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल

PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार हे आमच्या विरोधकांच्या राजकारणाला कंटाळले होते आणि आता आपला देश योग्य त्या मार्गाने विकास करत असल्याची त्यांची खात्री झाली त्यामुळेच ते आमच्यासोबत आले आहेत, असे परखड मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी लोकमत समूहाला विशेष मुलाखत दिली. लोकमत समूहाचे सह-व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलते केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही मुलाखत पार पडली.

या मुलाखतीत सध्या प्रचारात भाजपचा प्रमुख मुद्दा असलेल्या विकसित भारत, रोजगाराचे प्रश्न, सरकारच्या प्राधान्यक्रमावर महाराष्ट्राचे असलेले स्थान, पवार कुटुंबात पडलेली फूट, उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का, एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपसोबत का आले, अशा अनेक कळीच्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांना बोलते केले. २०४७ पर्यंतचा विकसित भारत आणि त्या दृष्टीने सरकारतर्फे सुरू असलेले काम यावर भाष्य करतानाच विरोधकांचाही मोदी यांनी समाचार घेतला. लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात अलीकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानावरही पंतप्रधानांनी परखड भाष्य केले. ज्या पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यांना पुन्हा स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावासा का वाटत आहे?, त्यांच्या या विधानामागे बारामतीच्या निकालाचे काही संकेत आहेत का?, असा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला. तर, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मात्र त्यांचा वारसा सांगणारे लोक त्यांच्या तत्त्वांना हरताळ फासत आहेत. बाळासाहेबांना हे रुचले असते का? अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

राज ठाकरे यांना सोबत का घेतले, प्रचारात मंगळसूत्र, पाकिस्तान हे मुद्दे कसे आले, भाजप सत्तेत आल्यास संविधानात बदल करेल, ही विरोधक जनतेच्या मनात घालत असलेली भीती, काँग्रेसचा जाहीरनामा या सर्व मुद्द्यांवरही मुलाखतीत पंतप्रधानांनी परखड भाष्य केले. इंडी आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवारच नाही. एकीकडे ते आघाडीतील घटक पक्ष म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवतात. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनता एखाद्या अनोळखी, विश्वास नसलेल्या व्यक्तीच्या हाती आपले भविष्य सोपवणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.

बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली

प्रश्न: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मला आता खोट्या प्रेमाची गरज नाही, असे विधान केले आहे. त्यामुळे एक थेट प्रश्न विचारतो. भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का?

उत्तर: मला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. आपल्या देशाच्या इतिहासातील ते अत्यंत प्रमुख आणि प्रभावी नेते आहेत. बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रहिताचे राजकारण केले. तुष्टीकरणाच्या राजकारणाचा त्यांनी विरोध केला. राजकारण काहीही असले तरी बाळासाहेबांच्या कुटुंबीयांतील प्रत्येक सदस्याबाबत मी प्रतिष्ठा कायम राखली आहे. बाळासाहेबांचा चाहता म्हणून मीच नाही तर त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांचा वारसा सांगणाऱ्या लोकांची कृती पाहून वेदना होत आहेत. मुंबई आणि तेथील जनता बाळासाहेबांच्या जिव्हाळ्याची होती. मुंबई बॉम्बस्फोटांच्या आरोपींना सोबत घेऊन त्यांचे उमेदवार प्रचार करत असल्याचे पाहून बाळासाहेबांना काय वाटले असते? ज्या लोकांनी सनातन धर्माचा विरोध केला, अशा लोकांसोबत गेल्याचे पाहून बाळासाहेबांना कसे वाटले असते? औरंगजेबाचा जयजयकार आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांसोबत युती केल्याचे बाळासाहेबांना रुचले असते का ? अशा गोष्टी केल्यानंतर बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा त्यांना हक्क आहे का ? सत्तेपेक्षा बाळासाहेबांनी कायमच तत्त्वे जपली. आता मात्र लोकांना सत्ता हेच सर्वकाही वाटते. यावर मी अधिक काय बोलणार?

जी काँग्रेस सोडली त्याच काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भाषा कशासाठी?

प्रश्न: राजकारण वेगळे आणि कुटुंब वेगळे. आपण मोठे आहात. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे पवार कुटुंब तुटेल याचा आपल्याला अंदाज नव्हता का? भाजपसोबत येण्यासाठी शरद पवार यांच्याशी कधी चर्चा झाली होती का?

उत्तर: शरद पवार हे अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबात जे काही झाले त्याचे उत्तर तेच देऊ शकतात. मात्र, राष्ट्र प्रथम आणि विकासावर आधारित राजकारण ज्यांना करायचे आहे त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे कायमच खुले आहेत. अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे; ते एनडीएमध्ये आले याचे कारण म्हणजे, विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला ते कंटाळले होते. आपला देश आता योग्य मार्गाने विकास करत असल्याची त्यांची खात्री झाल्यामुळेच ते आमच्यासोबत आले. मला शरद पवार यांचे आश्चर्य वाटते. ते म्हणतात की, भविष्यात लहान पक्षांनी काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावे. यातून बारामतीच्या निवडणुकीचे काही संकेत मिळत आहेत का ? की, ज्या पद्धतीने संपूर्ण राज्य मतदान करत आहे ते पाहून त्यांना नैराश्य आले आहे का? नाही तर, ज्या शरद पवारांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला, तेच शरद पवार आता पुन्हा त्याच काँग्रेसमध्ये विलीन होण्याची भाषा का करत आहेत ? हा मलाच पडलेला प्रश्न आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री यापेक्षा, ते महाराष्ट्रात सुशासन राखत आहेत हे महत्त्वाचे आहे 

प्रश्न: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीस थोडे निराश झाले होते. तुम्ही त्यांची समजूत काढलीत. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासाठी पुढील योजना काय आहे?

उत्तर:भाजपा हा केडरबेस पक्ष आहे. आमचे कार्यकर्ते राष्ट्रहितासाठी आणि जनकल्याणासाठी एका भावनेने काम करतात. आमच्या पक्षातर्फे कार्यकर्त्याला जे सांगितले जाते ते स्वखुशीने करणे ही आमच्या कार्यकर्त्याची ओळख आहे. आता अलीकडचेच पहा, अनेक राज्यांत आमच्या नेत्यांनी जिथे राज्याची धुरा सांभाळली त्यांना पक्षाने जेव्हा दुसरी जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी ती स्वीकारली. 

भाजपने देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यास सांगितले, त्यावेळी त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून ते कर्तव्य पार पाडले. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी उत्तम काम केले. मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे गेल्या अनेक वर्षांतले देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत उत्तम विकास केला. आता पक्षाने त्यांना दुसरी जबाबदारी दिलेली आहे. ते अत्यंत मन लावून ती जबाबदारी पार पाडत आहेत. ही भाजपाची संस्कृती आहे. महाराष्ट्रात सुशासन राखणे हे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य ध्येय आहे. ते मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री यापेक्षादेखील ते महाराष्ट्रात सुशासन राखत आहेत हे महत्त्वाचे आहे.

राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत

प्रश्न: लोकांच्या मनात प्रश्न आहे की, भाजपला विजयाची एवढी खात्री होती तरी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत का घेतले?

उत्तर: मी आधीच सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. गेल्या १० वर्षांपासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत. मात्र, तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचे स्वागत केले आहे. आपल्या लोकशाहीसाठी हे चांगले आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे केव्हाही चांगलेच असते. राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत. त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे आम्हाला वाटते. त्यामुळे हे एकत्र येणे केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी आहे, असे नाही. लोकसेवेसाठी एकत्र येणे, हा त्यामागचा उद्देश आहे. वस्तुत: देशहितासाठी जो कोणी आमच्याकडे येईल, त्या प्रत्येकाचे आम्ही सहर्ष स्वागतच करू.

महाराष्ट्रात मी नकली शिवसेनेवर आसूड ओढतो

प्रश्न: अलीकडे तुम्ही प्रचारात प्रादेशिक नेत्यांवर टीका करत असता. यापूर्वी तुम्ही राष्ट्रीय नेत्यांना लक्ष्य करत असत. असे का?

उत्तर: तुम्ही जर माझ्या भाषणांकडे बारकाईने पाहिले तर आमच्या सरकारने काय चांगले काम केले आहे, हे सांगण्यावर माझा अधिक भर असतो. प्रथमत: मी कोणत्याही नेत्यांना लक्ष्य करत नाही. तर राजकीय नेत्यांच्या विचारधारा आणि त्यांच्या कृती यासंदर्भात मी प्रश्न उपस्थित करत असतो. मी जेव्हा तेलंगणात जातो त्यावेळी तिथे काँग्रेसने करून ठेवलेल्या चुका मी लोकांच्या निदर्शनास आणून देतो. त्याचवेळी बीआरएसने तेलंगणाची कशी दुर्दशा करणे चालवले आहे, हेही मी दाखवून देतो. तामिळनाडूत मी द्रमुक आणि काँग्रेस यांची पोलखोल करतो. महाराष्ट्रात मी नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर टीकेचे आसूड ओढतो.

प्रश्न: विरोधी पक्ष आपल्यावर टीका करतो. महाराष्ट्रात सध्या अनेक पक्ष आहेत. मग तुमच्याच पक्षाला लोक का मतदान करतील असे वाटते?

उत्तर: जनसामान्यांच्या आयुष्यात बदल घडेल अशा अनेक उपयोगी योजना आम्ही तयार केल्या आणि यशस्वीपणे राबवल्या. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लोकांना मिळणारे मोफत उपचार, जनऔषधी अंतर्गत स्वस्त दरात मिळणारे औषध, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेली घरे, जल जीवन मिशन अंतर्गत लोकांना मिळणारे पिण्याचे स्वच्छ पाणी, पीएस किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे थेट आर्थिक सहकार्य अशा कित्येक योजनांचा मला आणि माझ्या सरकारला उल्लेख करता येईल. हे आमचे कार्य आहे.

प्रश्न: गेल्या वेळी महाराष्ट्राने आपल्याला ४१ जागा निवडून दिल्या होत्या. यावर्षी महाराष्ट्राकडून काय अपेक्षा आहे?

उत्तर: एनडीएच्या विकासावर आधारित दृष्टिकोनाला महाराष्ट्राने कायमच साथ दिलेली आहे. मी त्यांच्या आशीर्वादासाठी अतिशय कृतज्ञ आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. लातूरला मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती आणि वंदे भारतमधील खुर्च्यांच्या देखभालीसाठी पुण्यात सुरू केलेले वर्कशॉप यामुळे अनेक नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. यामुळे देश देखील स्वंयपूर्ण झाला आहे. अटल सेतू सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण पूर्ण केला आणि आपले जगणे सुसह्य झाले हे लोकांना देखील जाणवले. महाविकास आघाडी आणि पूर्वी केंद्रात असलेल्या यूपीए सरकारच्या काळात झालेला भ्रष्टाचार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. महाराष्ट्रातील लोकांना आता घोटाळे नको आहेत. त्यांना चांगल्या योजना हव्या आहेत. प्रसिद्धीसाठी काम करणारे लोक महाराष्ट्रातील जनतेला नको आहेत, जनहितार्थ योजना जनतेला हव्या आहेत. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील जनता गेल्यावेळपेक्षा मोठा विजय आम्हाला देईल.

प्रश्न: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे महाराष्ट्रात जागावाटपात भाजपच्या वाट्याला कमी जागा आल्या. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले निष्ठावान भाजप कार्यकर्ते नाराज आहेत..

उत्तर: एक लक्षात घ्या. घटक पक्षांना बरोबर घेऊन चालण्यावर भाजपचा विश्वास आहे. आम्ही दीर्घकाळापासून आघाडीत आहोत त्यामुळेच भारतीय राजकारणाच्या इतिहासात एनडीएचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. आमच्या मित्रपक्षांनाही आम्ही तितकेच मानाचे स्थान देतो. त्यांच्या आशा-आकांक्षांनाही प्रतिनिधित्व मिळावे, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच त्यांना आघाडीत पुरेसे स्थान मिळेल, याची आम्ही सतत काळजी घेत असतो. आमच्या कार्यकर्त्यांना याची पूरेपूर जाणीव आहे. म्हणूनच आम्ही जेव्हा मित्रपक्षांशी जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो त्यावेळी देश आणि राज्य यांच्यासाठी नेमके काय हिताचे ठरेल, याचा सर्वप्रथम विचार केला. आमच्या महायुतीचे काम असेच चालते.

प्रश्न: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे की, आमचे पक्ष ओरिजिनल आहेत.

उत्तर: तुम्ही जेव्हा महाराष्ट्राकडे पहाल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल की, मूळची राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेबांची शिवसेना भाजपबरोबर आहे. तरीही विरोधात असलेले राजकीय नेते विनाकारण जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, या स्पष्ट रणनीतीमुळे आमचा राज्यातील स्ट्राइक रेट वाढेल. ज्या जागांवर आम्ही लढत आहोत त्यावर नक्कीच विजयी होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल.

प्रश्न: विरोधी पक्षांचे मत आहे की, तुमची महायुती अधिक काळ टिकणार नाही...

उत्तर: केंद्रात २०१४ आणि २०१९ मध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत असूनही आम्ही आमच्या मित्रपक्षांना सरकारमध्ये योग्य स्थान दिले. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात आम्ही सर्वात मोठा पक्ष असूनही मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. काँग्रेसचे मात्र तसे नसते. त्यांना आपल्या मित्रपक्षांना कमकुवत करायचे असते. आताही तुम्ही इंडी आघाडीकडे पाहिले तर काँग्रेसचे शहजादे केरळमध्ये त्यांच्या स्वत:च्या आघाडीतील घटक पक्षाविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यांचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच आघाडीतील मित्रपक्षाशी लढत आहे, असे चित्र तुम्हाला दिसेल. एनडीए आणि इंडी आघाडीतील या फरकाची तुलना केली तर कोण सगळ्यांना बरोबर घेऊन जाते आणि स्थिर व मजबूत सरकारचा वायदा करते, हे तुमच्या सहजपणे लक्षात येईल.

प्रश्न: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विकास हा मुद्दा होता. मात्र, अचानक असे काय घडले की हिंदू कार्ड, मंगळसूत्र आणि पाकिस्तान हे मुद्दे प्रचारात आणावे लागले?

उत्तर: मी आधी म्हटल्याप्रमाणे तुम्ही माझ्या भाषणांचा बारकाईने अभ्यास केला तर आम्ही आमच्या सत्ताकाळात काय चांगले काम केले, हे सांगण्यावर माझा अधिक भर असतो, हे तुमच्या लक्षात येईल. मात्र, प्रसारमाध्यमांना इतर मुद्द्यांमध्ये अधिक रूची आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडीची जी लक्तरे मी वेशीवर टांगतो त्यावर आधारलेले मथळे देण्यातच प्रसारमाध्यमांना अधिक आवडते. मला तुम्हालाच विचारावेसे वाटते. लोकांकडील संपत्तीचे सर्वेक्षण करून ज्याच्याकडे अधिक असेल ती काढून घेऊन इतरांना संपत्तीचे वितरण केले जाईल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. याबद्दल मी बोलायला हवे, हो की नाही? पाकिस्तान सरकारातील प्रभावी लोकांचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा आहे, हे मी निदर्शनास आणून दिले पाहिजे की नको? काँग्रेसने जर संविधानाला बाजूला सारत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले असेल तर त्यावर बोलायला हवे की नको?

काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत

प्रश्न: आपण काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्ला का चढवला?

उत्तर: तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला आहे ना? त्यात अनेक घातक कल्पना मांडण्यात आल्या आहेत. तुम्हाला काँग्रेसच्या तुष्टीकरणाचा इतिहास ठावूकच आहे. काँग्रेसचे राजपुत्र कशी माओवाद्यांची भाषा बोलत आहेत, हेही तुम्ही पाहात आहात. त्यामुळे या सर्व मुद्द्यांकडे बोट दाखवणे, त्यातील उणिवा निदर्शनास आणून देणे, हे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य नाही का?

प्रश्न: विरोधी पक्ष केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावरच तुम्हाला का धारेवर धरत आहेत?

उत्तर: २०१४ नंतर सर्व भारतीयांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली. आमच्या सबका साथ, सबका विकास या मंत्राने प्रत्येक समुदायाच्या प्रत्येकाला विकासाच्या मंचावर एकत्र आणले. आम्ही आमच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे समर्पित भावनेने सर्वांची सेवा केली आहे. जी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांच्या भेदभावपूर्ण राजकारणाच्या कैक पटींनी विरोधाभासात्मक आहे. आपण लोकांमध्ये जातीपातीवरून दुही निर्माण करू शकत नाही, हे काँग्रेसला आता कळून चुकले आहे. त्यामुळेच त्यांनी आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम चालवले आहे. उलट आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनेच मोठे पाप केले आहे. त्यांनी ओबीसींचे आरक्षण ओरबाडून त्यांच्या व्होटबँकेला ते वाटून टाकले आहे.

प्रश्न: तर, काँग्रेस आणि भाजप यांच्या दृष्टिकोनातील नेमका फरक काय आहे?

उत्तर: विरोधकांचा हेतू समजण्यासाठी तुम्हाला त्यांचे राजकारण समजून घ्यावे लागेल. २०१४ पूर्वी त्यांचे राजकारण लोकांमध्ये जातीपातीवरून भेद निर्माण करत काही धार्मिक व्होट बँक तयार करणे, यावर चालत होते. विकास हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर कधीच नव्हता. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांनंतरही आपल्या लोकांना विशेषत: अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना स्वच्छतागृहे, नळ जोडण्या आणि डोईवरील छप्पर या मूळ गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत होता. लोकांना विकास हवा आहे. त्यांना अमूक पक्षाशीच बांधून राहणे फारसे रुचत नाही. जो पक्ष त्यांच्यासाठी काम करतो त्याच्या मागे जाण्यात लोकांना कमीपणा वाटत नाही. त्यामुळे साहजिकच लोक आमच्याकडे येतात. कारण भाजपाची विकासावर श्रद्धा आहे. आम्ही केवळ याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आम्हाला समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी काँग्रेस फक्त त्यांची मते मिळवायची. आमच्या या दृष्टिकोनामुळे आता काँग्रेस अस्वस्थ झाली आहे.

प्रश्न: टीकेचे नेमके लक्ष्य कोण असते?

उत्तर: संपूर्ण देशात एक पक्ष आणि त्या पक्षाचे कुकर्म सर्वत्र सारखेच असल्याचे तुमच्या निदर्शनास येईल. हा पक्ष म्हणजे काँग्रेस. देशापुढील सर्व समस्यांचे मूळ कारण काँग्रेसच आहे. तसेच देशाला मागास ठेवण्यासाठी ज्या काही शक्ती काम करत आहेत त्यांचे चुंबकीय क्षेत्रही काँग्रेसच्याच परिघात आहे, हेही तुमच्या निदर्शनास येईल.

प्रश्न: या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बहुमत प्राप्त करण्यासाठी आपली प्राथमिकता काय आहे. आपल्या अजेंड्यावरील पहिला मुद्दा काय आहे?

उत्तर: आमचा अजेंडा अगदी सुस्पष्ट आहे आणि आम्ही अत्यंत स्पष्टपणे तो मांडत आहोत. विकसित भारताचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला प्रत्येक प्रयत्न आम्ही करीत आहोत. याकरिता, आगामी पाच वर्षांचे नियोजन आम्ही केलेले आहे; तसेच नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत नेमके काय करायचे आहे त्याचीदेखील आम्ही योजना तयार केलेली आहे.

प्रश्न: आपण ‘२०४७ चे व्हिजन’, ‘पहिले शंभर दिवस’ याविषयी बोलता. आपल्या नेमके काय मनात आहे..?

उत्तर: तुम्ही देखील व्यक्तिगत आयुष्यात निश्चित दृष्टी ठेवून काम करता ना... माझेही तसेच आहे. ज्यांनी माझी कार्यशैली जवळून पाहिलेली आहे त्यांना हे माहिती आहे की, आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत मी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत; तसेच पुढील पाच वर्षांत त्याचा वेग व गती कायम राहील, यादृष्टीने रचना केलेली आहे. आता भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यादृष्टीने आम्ही यापूर्वीच काम सुरू केले आहे. २०४७ साठी आम्ही जे विकसित भारताचे ध्येय निश्चित केले आहे त्याकरिता आम्ही २४ तास कार्यरत राहणार आहोत. प्रत्येक भारतीयाची आकांक्षापूर्ती करण्यासाठी मी प्रत्येक क्षण कार्यरत आहे.

प्रश्न: २०४७ पर्यंत विकसित भारत ही आपली घोषणा राष्ट्रीय मुद्दा असेल का?

उत्तर: आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, २०४७ पर्यंत विकसित भारताची निर्मिती करणे हे एका व्यक्तीचे किंवा एका पक्षाचे काम नाही. भारताच्या लोकांनी हृदयापासून हे लक्ष्य गाठण्याचे आव्हान निश्चित केले आहे. गेल्या १० वर्षांत झालेल्या विकासकामांमुळेच आपला देश आता विकसित भारताचे स्वप्न पाहत आहे. २०१४ पूर्वीचा काळ आपण आठवून पाहा.

प्रश्न: आपण २०४७ बद्दल बोलता पण गेल्या पाच वर्षांचे काय?

उत्तर: २०१९ मध्ये जेव्हा आमचे सरकार स्थापन झाले त्यानंतर पहिल्या १०० दिवसांत आम्ही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.  जम्मू, काश्मीर व लडाख येथे लागू असलेले कलम ३७० हटवणे, ‘यूएपीए’सारख्या कायद्यामध्ये सुधारणा करून दहशतवादविरोधी कायदा अधिक सक्षम करणे, ट्रिपल तलाकचे विधेयक मांडून त्याचे कायद्यात रूपांतर करणे, बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी बँकांचे विलीनीकरण करणे, अनेक क्षेत्रामध्ये थेट परदेशी गुंतवणुकीसाठी आवश्यक त्या सुधारणा करणे, लहान गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या योजनांना पायबंद घालण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कठोर कायदा तयार करणे, शेतमालावरील किमान हमीभावात वाढ करणे, पीएम-किसान ही योजना केवळ लघू व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी होती त्याची व्याप्ती वाढवत ती सर्व शेतकऱ्यांना लागू करणे, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करणे, जल-शक्ती मंत्रालयाची स्थापना करणे असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय व त्याची अंमलबजावणी आम्ही केली आहे.

प्रश्न: ...म्हणजे आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे?

उत्तर: ‘यूपीए’प्रणित सरकारच्या दशकभराच्या कालावधीमध्ये देशातील शोषित-वंचित घटक, बँकिंग व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांच्या व्यवस्थापनात गलथानपणा होता. भ्रष्टाचार आणि धोरण लकव्यामुळे लोक वैतागले होते. त्यानंतर आम्ही केलेले काम लोकांसमोर आहे.

प्रश्न:  भाजप सत्तेत आला तर संविधान बदलेल, हा विरोधकांचा प्रचार आहे. तुमच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी प्रचारादरम्यान हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही विरोधी पक्ष सातत्याने हा मुद्दा लावून धरत आहे. असे का?

उत्तर: एक लक्षात घ्या मोदी आज जो कोणी आहे तो केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आहे. अशा सशक्त आणि सक्षमकारक संविधान व लोकशाहीशिवाय माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता पंतप्रधानपदापर्यंत पोहोचूच शकला नसता. हे सर्व आपल्या राज्यघटनेचे यश आहे. त्यामुळे तुम्ही तर्काच्या चष्म्यातून पाहिल्यास संविधानाच्या पावित्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणे, हे माझ्या स्वत:च्या हिताचे आहे, जे मी प्रामाणिकपणे करतो आहे. आपल्या संविधानाचे आणि लोकशाहीचे उल्लंघन कोणाच्या काळात अधिक झाले, याचा विचार केलाय का तुम्ही ? काँग्रेसच्या कार्यकाळातच ही सर्व पापे अधिक प्रमाणात झाली आहेत. कोणताही विधिनिषेध न बाळगता सर्रास राज्य सरकारे बरखास्त करण्याचे काम काँग्रेसनेच सर्वाधिक वेळा केले आहे. काँग्रेसच्या इतिहासात अशी घटनेची पायमल्ली केलेली १०० उदाहरणे सापडतील. लोक काँग्रेसचा इतिहास विसरलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेस किंवा इंडी आघाडीच्या प्रचारातील या प्रोपगंडावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही.

प्रश्न: एकीकडे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यास सज्ज आहे. त्याचवेळी देशात अजूनही ८० कोटीजनतेला मोफत धान्यपुरवठा केला जात आहे. हे अंतर कमी करण्यासाठी काय योजना आहे आपल्याकडे?

उत्तर: संसदेत यावर मी सविस्तर निवेदन दिले आहे. पण, आपल्या वाचकांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो. जगात आपण लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहोत. गेल्या १० वर्षांत २५ कोटी जनतेला आम्ही दारिद्र्याच्या खाईतून वर आणले आहे. गरिबी काय आहे, हे मी जवळून अनुभवले आहे. तुम्ही गरिबीतून वर आलात, पण काही सुरक्षा तुम्हाला नसेल तर नशिबाचा एक वळसा तुम्हाला पुन्हा गरिबीच्या खाईत लोटू शकतो. तुम्ही आमच्या कल्याणकारी योजना बारकाईने पाहिल्या तर गरिबीच्या खाईत कोणी पुन्हा लोटले जाऊ नये, अशा पद्धतीने त्यांची आखणी करण्यात आल्याचे तुमच्या लक्षात येईल. आयुष्मान भारत योजनेचेच उदाहरण घ्या. गरिबीतून वर आलेल्या कुटुंबाला काही तातडीची वैद्यकीय गरज लाभली तर त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मोफत मिळतील, याची हमी ही योजना देते. ही योजना केवळ जीवच वाचवते असे नव्हे तर त्या कुटुंबावर पडणारा आर्थिक भारही हलका करते. आता तर ही योजना ७० वर्षे वयावरील लोकांनाही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात मध्यम वर्गातील कुटुंबांनाही योजनेचा लाभ होईल.

प्रश्न: मोफत अन्नधान्य पुरवठा योजनेचा लोकांना लाभ होत आहे का?

उत्तर: देशात कोणतीही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. जे गरीब आहेत त्यांच्यासाठी ही योजना वरदान आहे. ते भुकेले राहू नये यासाठी ही योजना आहे. त्याचवेळी ज्या लोकांनी दारिद्र्य अनुभवले आहे आणि जे दारिद्र्य रेषेतून वर आले आहेत त्यांना ही योजना अन्नसुरक्षा पुरवते. या लोकांना दारिद्र्य रेषा ओलांडून आणखी पुढे जाण्यासाठी मदतीचा हात हवा असतो. एक पक्के समर्थन हवे असते. मोफत अन्नधान्य पुरवठा योजना ही गरज पूर्ण करते. भुकेल्या लोकांना त्यामुळे अन्न मिळते. देशात कोणताही गरीब भुकेला राहत नाही. घरातली चूल पेटती राहावी यासाठी पैसे देऊन धान्य खरेदी करण्याची गरज या योजनेमुळे थोडी कमी होते. याचा अर्थ असा की, केवळ पोटातली आग शमविण्यासाठी कर्ज काढण्याची गरज या योजनेमुळे राहत नाही. साहजिकच केवळ अन्नासाठी गरीब जनता कर्जाच्या जाळ्यात अडकत नाही, हे या योजनेचे मोठे यश आहे. जसजसा गरीब वर्ग मध्यम वर्गाकडे वाटचाल करत जाईल, तसतशी आपोआप या योजनेची मागणी कमी होत जाईल.

आम्ही सर्वसमावेशक असा राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार केला आहे

प्रश्न: सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज का भासली?

उत्तर: गुजरातचा मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्राचे काम जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे दुसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान झालो तेव्हा सहकार क्षेत्राची ताकद देशहितासाठी वापरली जावी या हेतूने त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना आम्ही केली. ‘सहकारातून समृद्धी’ या विचारावर माझी प्रगाढ श्रद्धा आहे. आम्ही सर्वसमावेशक असा राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार केला आहे. त्याचबरोबर आम्ही हजारो प्राथमिक सहकारी संस्था, जिल्हा सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँका यांचे डिजिटायझेशन केले. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर अधिक भर दिला. आम्ही दहा हजार गावांमध्ये बहुउद्देशीय सहकारी संस्थांची स्थापना केली असून त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहोत. साखर सहकारी संस्थांचे वर्षानुवर्षे अडकलेले प्राप्तिकरविषयक वाद आम्ही सोडवले. त्यातून त्यांना ४६ हजार कोटींचा नफा झाला. सहकार क्षेत्राविषयी मला व्यक्तीश: खूप प्रेम आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नजीकच्या काळात आम्ही अधिकाधिक कल्याणकारी योजना राबवू.

वस्तुनिष्ठ मुद्द्यांवर चर्चेऐवजी खोट्या गोष्टी पसरवतात...

प्रश्न: स्टार्टअप, मेक इन इंडिया योजनांचा देशाला किती फायदा झाला आणि या योजनांमुळे रोजगारात वाढ झाली आहे का?

उत्तर: रोजगार निर्मिती आणि विकास या दोन्ही मुद्द्यांतील वस्तुस्थिती तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या प्रमुख माध्यम समूहाने समजून घेतली, याचा मला विशेष आनंद आहे. जेव्हा आम्ही रोजगार, नोकऱ्या यांच्याबद्दल बोलतो, त्यावेळी नेहमीच वस्तुनिष्ठ मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र, उद्योजकता किंवा नव्याने निर्माण झालेली क्षेत्रे या सर्वांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी निश्चितपणे मिळाव्यात, यासाठी आम्ही बहुव्यापी रणनीती आखली आहे. उदाहरणार्थ सरकारी नोकऱ्यांचेच पाहा. आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मी नियमितपणे रोजगार मेळावे घेतले आहेत. याद्वारे लाखो तरुणांना त्यांच्या नोकरीचे पत्र मिळाले आहे. खासगी क्षेत्रात उत्पादन क्षेत्र व स्टार्टअप यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

प्रश्न: आपण जेव्हा विकसित भारताबद्दल बोलता, तेव्हा लोक या गोष्टी किती मनापासून ऐकताना दिसतात ?

उत्तर: शतकभराच्या कालावधीमध्ये यावे अशा एका कोव्हिडच्या संकटाचा आपण सामना केला. देशाने एकत्र येऊन अनेकांचे जीव वाचवले, गरीबांची काळजी घेतली. आपण लसींची निर्मिती केली. या लशी आपण केवळ आपल्याच नागरिकांना दिल्या नाहीत, तर परदेशातदेखील पाठवल्या. या सर्व कालावधीमध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेत आपण आपली अर्थव्यवस्थादेखील सक्षमपणे सांभाळली. कोव्हिड काळानंतर जगाचा भारताकडे आणि भारतीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यांना आपल्याबद्दल अधिक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आता ही भारताची वेळ आहे. म्हणून, मी म्हणतो की, यही समय हैं, सही समय हैं. जगण्याच्या नित्याच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी गेली अनेक दशके संघर्ष केल्यानंतर आता अखेर देशातील १४० कोटी जनतेला भविष्याबद्दल आशा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच विकसित भारताचे स्वप्न लोकांनी त्यांच्या वैयक्तिक स्वप्नांशी जोडले आहे आणि जिथे मी जातो व यावर बोलतो त्यावेळी लोक या स्वप्नामुळे प्रेरित झाल्याचे मला जाणवते. लोक या गोष्टी ऐकताना दिसतात.

प्रश्न: तुम्ही मुद्रा योजनेबद्दल बोलता. मात्र, उद्योजक होणाऱ्या तरुणांसाठी आपल्या सरकारने नेमके काय केले?

उत्तर: बरे झाले तुम्ही मुद्राचा विषय काढलात. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा सारख्या योजना आम्ही प्रभावीपणे राबवल्या. या योजनेमुळे देशात ८ कोटी लोक नव्याने किंवा प्रथमच उद्योजक बनले आहेत. या उद्योजकांनी आणखी लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. आता मुद्रा योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम दुप्पट करण्याचे आम्ही आश्वासन दिले आहे. यामुळे आगामी काही वर्षांत उद्योजकांची संख्या वाढतानाच त्यांच्याद्वारे निर्माण होणाऱ्या रोजगाराची संख्या देखील तुम्हाला वाढताना दिसेल.

प्रश्न: स्टार्टअपमुळे निर्यातीला फायदा झाला का?

उत्तर: मेरा हमेशा से यही मानना रहा है... तरुण ऊर्जावान पिढीला स्टार्टअप उद्योगात आणले पाहिजे. आपण यात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आजवर आपण मोबाइल फोनची आयात करत होतो, पण आता मोबाइल उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. आपण खेळणी देखील आयात करत होतो. मात्र, आता आपल्या खेळण्यांची निर्यात हे लक्षणीय वाढलेली आहे. गेली दहा वर्षांतील संरक्षण क्षेत्रातील आपली निर्यात वीस पटीने वाढलेली आहे. ही केवळ काही उदाहरणे आहेत. जेव्हा अशा क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर विकास होतो त्यावेळी विविध कौशल्याधारित अनेक नोकऱ्यांची निर्मिती होते. स्टार्टअपबद्दल आणखी आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, लाखो तरुण आज स्टार्टअप उद्योगात आहेत, यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे.

प्रश्न: पण, त्यासाठी औपचारिक नोकऱ्यांची संख्यादेखील वाढायला हवी ती वाढल्याचे आपल्याला वाटते का...?

उत्तर: जेव्हा औपचारिक नोकऱ्यांचा मुद्दा येतो, त्यावेळी केंद्रीय भविष्य निर्वाह निधीमध्ये ६ कोटींपेक्षा जास्त नवीन सदस्य जोडणी झाल्याचे अहवाल सांगतो. ही केवळ आकडेवारी नाही तर तरुणांची स्वप्नपूर्ती झाली असे आपल्याला म्हणता येईल. गेली दहा वर्षांत अनेक विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम, एम्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली. अशा पद्धतीच्या सामाजिक पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्यामुळे सोबतच नोकऱ्यांची देखील निर्मिती झाली.

मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटतो तेव्हा...

प्रश्न: कृषी आणि सहकार या दोन गोष्टी महाराष्ट्राची प्रमुख ओळख आहेत. परंतु, ही दोन्ही क्षेत्रे सध्या अडचणीत आहेत. त्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत?

उत्तर: महाराष्ट्रातील शेतकरी कष्टाळू आणि उद्योगी आहे. मात्र, दुर्दैवाने २०१४ पूर्वीच्या सर्व सरकारांनी राज्यातील शेतकऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले. विशेषत: महाराष्ट्रातील एका नेत्याकडे केंद्रातील कृषी आणि तत्संबंधी महत्त्वाची खाती दीर्घकाळपर्यंत होती, तरीही शेतकऱ्यांची दुरवस्था झाली. २०१४ मध्ये आम्ही जेव्हा केंद्रात सत्तेत आलो त्यावेळी मी देशभरातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची यादी मागवून घेतली. जेणेकरून ते जलदगतीने मार्गी लावले जातील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, यादीतील ९९ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प महाराष्ट्रातील होते. त्यातले काही तर अगदी १९७० पासून रखडलेले होते. हे अनेक दशके रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले, पूर्ण केले, काही नवीन सुरू केले आणि तेही पूर्ण केले. जेव्हा मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भेटतो तेव्हा ते मला पीएम-किसान थेट उत्पन्न हमी आणि कृषी विमा योजना यांविषयी भरभरून सांगतात. या दोन्ही योजना त्यांच्यासाठी विलक्षण उपयुक्त ठरल्या आहेत. उसाच्या शेतीसंदर्भातही आम्ही अनेक सुधारणा राबविल्या आहेत. महाराष्ट्रासाठी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. अनेकांच्या थकबाकी आम्ही जलदगतीने पूर्ण केल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एक नवीन कृषी परिसंस्था निर्माण करत आहोत. त्याचा मूळ गाभा सिंचन, विमा, निर्यातीच्या माध्यमातून विदेशातील बाजारात प्रवेश, इथेनॉलसारखे हरित उपक्रम इत्यादींचा समावेश असेल.

प्रश्न: जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानावर मोठी चर्चा होत आहे. या क्षेत्रात भारताचे स्थान कुठे आहे?

उत्तर: एआय हा आता कळीचा मुद्दा आहे. या क्षेत्राकडे आमचे विशेष लक्ष आहे. केवळ एआय नव्हे तर त्याचसोबत गेमिंग क्षेत्रामध्ये मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात आपली मुले अतिशय उत्तम काम करत आहेत. इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या उत्पादनात विशेषतः सेमी कंडक्टर निर्मितीसाठी आपण महत्त्वाची पावले उचलत आहोत. या क्षेत्रांना बळकटी देणे हे केवळ रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे नाही तर या क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण होत आहोत ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. भविष्यासाठी आमचे ध्येय अत्यंत सुस्पष्ट आहे.

प्रश्न: आपण देशाबद्दल बोलतो, पण त्यात महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे?

उत्तर: विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र, हे आमचे दीर्घकालीन ध्येय आहे. याचा अर्थ आगामी पाच वर्षांत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांच्या विकासासाठी अधिक जोरात काम करण्यात येणार आहे. प्रमुख आर्थिक केंद्रापासून ते माहिती तंत्रज्ञान, कष्टाळू शेतकरी, औद्योगिक पायाभूत सुविधा, उत्तम समुद्रकिनारा, धैर्य आणि सामाजिक सुधारणांची उज्ज्वल परंपरा असे सर्व काही महाराष्ट्रात आहे. ही सर्व नैसर्गिक बलस्थाने लक्षात घेऊन लोकांचे आयुष्य सुकर बनवण्यासाठी योग्य ती धोरणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे. कोणताही प्रकल्प घ्या, मग तो सिंचन प्रकल्प असेल, नवे रुग्णालय असेल, नवा उद्योग, हाय-वे, मेट्रो किंवा विमानतळ, लोकांचे जीवनमान सुसह्य होईल, हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवूनच आम्ही करतो आणि याची गती आणखी वाढताना दिसेल. महाराष्ट्रात सर्वोत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे केवळ मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांनाच बळकटी मिळेल असे नाही, तर विकासाची अनेक नवीन केंद्रे महाराष्ट्रात निर्माण होतील. विमान असो किंवा बाजारपेठेशी संलग्नता शेतकऱ्यांना प्रत्येक सेवा-सुविधा देऊन सक्षम केले जाईल. महाराष्ट्रामध्ये विभागनिहाय वैविध्यता आहे. या वैविध्यतेत प्रत्येकाची जशी स्वतःची बलस्थाने आहेत, तशाच त्यांच्या गरजादेखील आहेत. त्या लक्षात घेऊन विभागनिहाय विकासाचे उद्दिष्ट आहे. समाजातील प्रत्येक घटाकाचा विकास करण्यासाठी भाजप आणि रालोआ सरकारने प्राधान्य दिले आहे.

प्रश्न: सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशासमोर आदर्श ठेवला...

उत्तर: हे खरं आहे. महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील एक प्रमुख राज्य आहे. आम्ही नव्याने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयामुळे या क्षेत्रातील तळागाळातील जनतेचा विकास होईल, या दृष्टीने सुधारणा केल्या जातील. सहकार क्षेत्राला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आम्ही मदत करू. याखेरीज, त्याशिवाय सहकाराचे मॉडेल मत्सशेती, अन्नप्रक्रिया उद्योग, सेवा क्षेत्र राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

प्रश्न: महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी खूप संधी असताना, त्यांना योग्य न्याय मिळतो, असे आपल्याला वाटते का?

उत्तर: तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. महाराष्ट्राला सगळ्यात मोठा सागरीकिनारा आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाईल. या सुविधांमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रात येतील आणि त्याचा फायदा स्थानिक अर्थव्यवस्था समृद्ध होण्यासाठी होईल. वस्त्रोद्योग, हातमाग, हस्तकला, कला, संस्कृती याचा मोठा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. या सर्व घटकांना मोठ्या व्यासपीठावर नेत या क्षेत्रातील लोकांची उन्नती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ऐतिहासिक किल्ल्यांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळे, क्रीडा प्रकार, निसर्गसंपन्ने ठिकाणे आणि समुद्रकिनारे आहेत. त्यामुळेही येथे पर्यटनासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे मला वाटते.

प्रश्न: महाराष्ट्रात कोणते नवे उद्योग, क्षेत्र आपल्या प्राधान्यक्रमावर आहेत?

उत्तर: आपको मै बोलता हूं... महाराष्ट्रात अपारक्षमता आहे. म्हणूनच, सेमी कंडक्टरचे उत्पादन, हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वित्तीय-तंत्रज्ञान क्षेत्र हे आमच्या जाहीरनाम्यात प्राधान्यक्रमावर आहेत. या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्राला मोठी संधी आहे आणि महाराष्ट्र राज्य या सर्व क्षेत्रांतील एक कळीचे क्षेत्र म्हणून विकसित होईल. महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्राचा विकास आणि लोकांच्या आकांक्षापूर्ती हेच आमचे ध्येय आहे.

प्रश्न: कोणत्या नवीन क्षेत्राकडे आपले लक्ष आहे?

उत्तर: हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भविष्यात ज्या क्षेत्रांचा विकास होणार आहे किंवा प्रभाव असणार आहे, अशा विषयांचा वेध घेत त्यामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही यापूर्वीच काम सुरू केले आहे. त्यामुळे अवकाश क्षेत्र असेल, आण्विक क्षेत्र असेल यामध्ये तरुणांना काम करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करत आहोत. उद्योजकतेचा विचार मनात रुजलेले तरुण या क्षेत्रात संचार करू लागले आहेत. तसेच, या क्षेत्राशी निगडीत स्टार्टअपच्या माध्यमातून नवा रोजगार देखील निर्माण करत आहेत. याचसोबत वातावरणस्नेही ऊर्जा निर्मिती या क्षेत्रात देखील गंभीरतेने काम सुरू आहे. हा एक महत्त्वाचा घटक असून ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा क्षेत्रांत रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत.

E-Paper मध्ये इंटरव्ह्यू वाचण्यासाठी Link:

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_MULK_20240512_8_1

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_MULK_20240512_9_1

Web Title: pm narendra modi exclusive interview to lokmat discussed evolving politics maharashtra politics rahul gandhi and congress uddhav thackeray sharad pawar eknath shinde shiv sena ncp pivotal policies post election agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.