निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू

By विजय.सैतवाल | Published: May 12, 2024 11:43 PM2024-05-12T23:43:10+5:302024-05-12T23:44:07+5:30

रात्री छातीत त्रास : गोळी घेऊन झोपले अन् सकाळी उठलेच नाही

Death of Amravati home guard who came for election security | निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू

निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी अमरावती येथून जळगावात आलेल्या संतोष बापूराव चऱ्हाटे (४८, रा. चिंचोली बु, रहिमापूर, ता. आंजनगाव, जि. अमरावती) या होमगार्डचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवार, १२ मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात सोमवार, १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी इतर जिल्ह्यातून पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील होमागार्ड बंदोबस्तासाठी जळगावात आले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था खान्देश सेंट्रल मॉल याठिकाणी करण्यात आली आहे. त्यानुसार याठिकाणी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विभागातील होमगार्ड संतोष चऱ्हाटे  यांची पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा येथे परिसर बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली. तसेच रविवार, १२ रोजी सकाळी आठ वाजता त्यांना एकलव्य क्रीडा संकुल येथे मतदान साहित्य वाटपच्या ठिकाणी बोलवण्यात आले होते.

रात्रीच छातीत होता त्रास
शनिवारी रात्री संतोष चऱ्हाटे व त्यांचे सहकारी अंकुश पडोळे यांनी सोबत जेवण केले. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले असता चऱ्हाटे यांनी पडोळे यांना छातीत किरकोळ दुखत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गोळी घेतली आणि छातीला बाम लावून ते झोपून गेले.

सहकाऱ्याने उठवले, शरीर थंडगार
सकाळी मतदान साहित्य वाटप ठिकाणी जायचे असल्याने पडोळे हे चऱ्हाटे यांना उठविण्यासाठी गेले. ते हालचाल करीत नसल्याने तसेच त्यांचे शरीर थंडगार जाणवल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला.

बंदोबस्तासाठी आलेल्या होमगार्डचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. चऱ्हाटे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह अमरावती येथे रवाना करण्यात आला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे करीत आहेत.

Web Title: Death of Amravati home guard who came for election security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.