फेक एन्काऊंटर! राजघराण्यातील आमदार राजावर पोलिसांनी गोळ्या झाडलेल्या; दिल्लीपर्यंत खुर्ची हादरलेली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 03:20 PM2023-04-18T15:20:27+5:302023-04-18T15:28:17+5:30

देशाच्या इतिहासातील पहिलीच घटना, राजा मानसिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला जीपने धडक दिलेली, मंच मोडून टाकलेला...

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या एन्काऊंटर आणि माफियाच्या हत्येवरून देशभरात खळबळ उडालेली असताना असे एक राजकीय एन्काऊंटर ज्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तर खुर्ची गेली, परंतू देशाच्या पंतप्रधानांच्या खुर्चीलाही हादरे बसण्याची वेळ आली होती. ३८ वर्षांपूर्वीची ही खळबळजनक घटना होती.

आज आम्ही तुम्हाला अशी एक सत्य घटना सांगणार आहोत, ज्यामुळे राजीव गांधींच्या सरकारची खुर्ची धोक्यात आली होती. राजस्थानमध्ये अशी परिस्थिती बनली की मुख्यमंत्र्यांना खूर्ची सोडावी लागली होती.

२१ फेब्रुवारी १९८५ चा दिवस, राजस्थानच्या डीगमध्ये दिवसाढवळ्या धडाधड गोळ्या झाडल्याचा आवाज झाला होता. राजा मानसिंह यांच्यावर पोलिसांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या होत्या. या हत्याकांडाला एन्काऊंटर भासविण्याचा पुरेपूर प्रयत्न झाले. मात्र, ३५ वर्षांनी या फेक एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली गेली.

निवडणुकीचा काळ होता. २० फेब्रुवारी १९८५ ला राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवचरण माथुर यांची सभा होणार होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राजा मानसिंह यांच्या राजघराण्याचे झेंडे काढून फेकण्याचा प्रकार घडला. राजा मानसिंह तिथले आमदार आणि राजघराण्यातील होते.

झेंडे उखाडल्याची गोष्ट मानसिंहांना पटली नाही. संतापलेल्या मानसिंह यांनी जीप काढली आणि तडक मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर जिथे उतरलेले ते स्थळ गाठले. यावेळी मानसिहांनी जीपने धडक मारून हेलिकॉ़प्टर उध्वस्त केल्याचे सांगितले जाते. घटनेवेळी मुख्यमंत्री शिवचरण तिथे नव्हते असे सांगितले जाते.

मानसिंह एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी उभारलेला मंचदेखील उध्वस्त केला. शिवचरण यांनी याच तुटलेल्या मंचावरून भाषण दिले. या साऱ्या प्रकारामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. डीग मतदारसंघातील या अपमानामुळे शिवचरण यांनीही ही घटना इज्जतीची केली.

त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी राजा मानसिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी मानसिंह त्यांच्या जीपमधून समर्थकांसह निघाले. तेव्हा त्यांना घराबाहेरच थांबवून राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलेय़, कर्फ्यू लागू आहे यामुळे बाहेर पडू नका, असे कार्यकर्त्यांनी समजावले.

यावर हे माझे राज्य आहे, इथे माझे कोण काय वाकडे करेल असे सांगत ते निघून गेले. प्रचाराचा काळ असल्याने ते लाल कुंडा निवडणूक कार्यालयातून प्रचारासाठी डीग पोलीस ठाण्यासमोरून जात होते. तेव्हा तिथे पोलिस अधिकारी डीएसपी कान सिंह भाटी यांनी रोखले.

याचबरोबर पोलिसांनी राजा मानसिंह यांच्या गाडीवर फायरिंग सुरु केली. मानसिंह यांच्यासह त्यांचे दोन साथीदार ठाकुर सुमेर सिंह व ठाकुर हरी सिंह यांची हत्या करण्यात आली. तर मानसिंह यांचे जावई कुंवर विजय सिंह बचावले. राजघराण्यानुसार मानसिंह पोलीस ठाण्यात सरेंडर करण्यासाठी जात होते.

पोलीस एवढ्यावर थांबले नाही, जो जावई बचावला त्याच्याविरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. जावयाला त्याच दिवशी जामिन मिळाला. यानंतर दोन दिवसांनी जावई विजय यांनी डीएसपींसह १७ पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेची आग केवळ राजस्थानातच नाही तर युपीलाही झळ बसली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदाराला पोलिसांनी ठार केले होते, तो देखील त्या प्रदेशातील राजघराण्याचा सदस्य. याची झळ पंतप्रधानांना देखील जाणवू लागली. २३ फेब्रुवारीला माथुर यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

यानंतर झालेल्या निवडणुकीत मानसिंह यांची मुलगी कृष्णेंद्र कौर दीपा आमदार झाल्या. सीबीआय चौकशी लागली. या काळात १९९० मध्ये त्या खासदार झाल्या. परंतू, त्या मागे हटल्या नाहीत. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या न्यायालयात लढत राहिल्या. २१ जुलै २०२० ला निकाल लागला, डीएसपीसह ११ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले.

आज माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभली असेल, असे उद्गार दीपा यांनी काढले. या खटल्याच्या थोड्य थोडक्या नाहीत १७०० तारखा लागल्या होत्या. अनेकदा न्यायाधीश बदलले गेले होते. ३५ वर्षे लागली निकाल यायला. ज्या १८ पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप होता त्यापैकी ४ जणांचा या काळात मृत्यू झाला, तिघांना पुरावे नसल्याने मुक्त केले तर ११ पोलिसांना दोषी ठरविण्यात आले होते.